Join us
Daily Top 2Weekly Top 5

महेश मांजरेकर निर्मित-दिग्दर्शित चित्रपट पुलंच्या जन्मशताब्दी वर्षात होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 16:53 IST

भाईंबद्दल बोलण्याएवढा मी मोठा नाही आहे. पण मला आत्तापर्यंत ज्या काही मोजक्या चरित्रपट अर्थात बायोपिक भावल्या त्यातील एक म्हणजे ...

भाईंबद्दल बोलण्याएवढा मी मोठा नाही आहे. पण मला आत्तापर्यंत ज्या काही मोजक्या चरित्रपट अर्थात बायोपिक भावल्या त्यातील एक म्हणजे रिचर्ड अॅटनबरो यांचा ‘गांधी’. मी हा चित्रपट किमान १५० वेळा पहिला आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये असताना कॉलेजला दांडी मारून हा चित्रपट प्लाझा चित्रपटगृहात एकापाठोपाठ एक असा पहिला. त्या चित्रपटाने मी भारावून गेलो आणि मला वाटते महेश मांजरेकर यांचा 'भाई: व्यक्ती की वल्ली?' हा चित्रपट त्याच तोडीचा होईल. महेश हे पु. ल. आणि प्रेक्षक यांच्यामधील पूल यशस्वीपणे बांधतील, असे उद्गार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी काढले. त्यांच्याच हस्ते सोमवारी सायंकाळी या चित्रपटाचा शुभारंभ वरळी येथे झाला. ८ नोव्हेंबर, २०१८ पासून पु. ल. देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष संपूर्ण जगभरात साजरे केले जाणार आहे. त्यानिमित्ताने याच काळात म्हणजेच ४ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार अशी घोषणा आज ११ जून रोजी वरळी येथे करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महेश मांजरेकर मुव्हीज, फाळकेज् फॅक्टरी- अ फिल्म मॅनेजमेंट कंपनी आणि ग्रेट मराठा एंटरटेन्मेंट कंपनी यांच्यातर्फे या चित्रपटाची प्रस्तुती केली जात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शनही महेश मांजरेकर करत आहेत. चित्रपटात भाई अर्थात पु. ल. देशपांडे यांची भूमिका सागर देशमुख तर सुनीताबाईंची भूमिका इरावती हर्षे साकारत आहेत. या चित्रपटाची पटकथा गणेश मतकरी यांची असून ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. रंगभूषेतील कौशल्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेले विक्रम गायकवाड रंगभूषेतून अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांना चेहरा देणार आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी पुलंनी उभ्या केलेल्या व्यक्तीरेकांवरील त्यांच्या कार्टून्सचे प्रदर्शन पुढील वर्षी भरविण्याची घोषणाही केली. “पुलंनी त्यांच्या व्यक्तिरेखा अजरामर केल्या. त्यातील अंतू बर्वा, नारायण यांसारख्या व्यक्तिरेखा, त्यांच्यावरील प्रसंग आणि त्या व्यक्तिरेखा मला कशा दिसल्या, याचे रेखाटन मी गेले ६-८ महिने करत आहे. पुढील ८ महिन्यात ते पूर्ण होईल आणि वर्षभरानंतर मी हे प्रदर्शन भरवीन,” अशी घोषणा यांनी केली. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि आपल्या बहुआयामी लिखाणाने अजरामर झालेले साहित्यिक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु. ल. देशपांडे यांच्यावरील चित्रपटाची घोषणा सोमवारी करण्यात आली. यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर, चित्रपटाचे लेखक आणि साहित्यीक रत्नाकर मतकरी, चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. पुलंनी मराठी वाचकांवर त्यांच्या साहित्याने मोहिनी घातली आणि त्यांच्या पश्चात आजही ती कायम आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे म्हणून मराठी माणूस आहे,तिथे पुलंचे साहित्य आहे. त्यांच्या साहित्यावर आधारित अनेक कलाकृती आजवर सादर झाल्या आणि त्या प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय ठरल्या, पण हा चित्रपट त्या कलाकृतींवर नाही, तर त्या कलाकृती जन्माला घालणाऱ्या पु. ल. देशपांडे यांच्या बहुढंगी व्यक्तिमत्त्वावर आधारित आहे. ‘पुलंवर मराठी माणसाचे किती प्रेम आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांचा अभिनय, त्यांचे साहित्य, त्यांचे वक्तृत्व, त्यांचा संगीताचा अभ्यास, त्यांचा दानशूरपणा, त्यांनी जपलेले सामाजिक भान हे सगळे आपण पाहिले आणि ऐकले आहे. त्याबद्दल अनेकदा वाचलेही आहे. पण असा हा अष्टपैलू अवलिया, माणूस म्हणून नेमका कसा होता? या लाडक्या व्यक्तिमत्वाचे व्यक्तिगत आयुष्य नेमके कसे होते, याबाबत फारसे कधी लोकांसमोर आलेच नाही. म्हणूनच ‘भाई: व्यक्ती की वल्ली’मधून पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्याचे अप्रकाशित पैलू प्रेक्षकांपुढे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे.” महेश मांजरेकर यांनी चित्रपट निर्मिती मागील भूमिका स्पष्ट केली. तरुण वयात प्रतिकूल परिस्थितीत पुलंनी घेतलेले उच्च शिक्षण, चित्रपट व्यवसायात त्यांना आलेले अनुभव, पत्नी सुनीता देशपांडे यांच्यासोबत आयुष्यभरासाठी जोडलेले भावबंध, आकाशवाणीमध्ये गाजवलेली कारकीर्द, भीमसेन जोशी-कुमार गंधर्व- वसंतराव देशपांडे यांच्यासोबत जुळलेले सूर, बाबा आमटे यांच्या ‘आनंदवना’तील समाजसेवा अशी त्यांची विविधांगी ओळख आहे. साहित्यिक असूनही त्यांनी आयुष्यभर सामाजिक आणि राजकीय भान जपले. रंगभूमीवर त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली आणि ती लोकप्रियही झाली. जगप्रवासातून त्यांना एक व्यापक दृष्टी प्राप्त झाली. या सर्व अंगांचा वेध घेत पुलंच्या कारकिर्दीचा आणि त्यांच्यातील माणूसपणाचा वेगळा आलेख मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येणार आहे. यामध्ये पु. ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे यांच्याबरोबरच जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. या भूमिका साकारण्यासाठी प्रथितयश आणि अभ्यासू कलाकारांची निवड झालेली आहे.