महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधुंची चर्चा आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आक्रमक झाले. हाच मुद्दा आता या बंधुंना पुन्हा एकत्र घेऊन येत आहे. सुरुवातीला दोन्ही पक्ष मिळून मोर्चा काढणार होते. मात्र सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. आता दोन्ही बंधू विजयोत्सव साजरा करणार आहेत. काही महिन्यांपूर्वी दिग्दर्शक, अभिनेता महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंना उद्धव यांच्यासोबत पुन्हा एकत्र येण्यावरुन प्रश्न विचारला होता. आता ठाकरे बंधुंच्या युतीच्या चर्चांवर महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar) प्रतिक्रिया दिली आहे.
'न्यूज १८'ला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले, "महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनातला प्रश्न मी राज ठाकरेंना विचारला होता. त्यानंतर असं काही होईल याचा मी विचारच केला नव्हता. पण मला कायम वाटतं की महाभारतापासून आपल्याकडे हा इतिहास राहिला आहे की का दोन भाऊ एकत्र येऊ शकत नाहीत? तोच इतिहास पुन्हा घडवण्यापेक्षा आपण तो बदलू शकत नाही का?" राज-उद्धव खरंच एकत्र येत आहेत का? नक्की काय चाललंय? यावर महेश मांजरेकर हसतच म्हणाले, 'ते मला काही माहित नाही.'
हिंदी सक्तीविरोधात कलाकार का बोलले नाहीत?
महेश मांजरेकर म्हणाले,"आम्ही अशा क्षेत्रात आहोत जिथे राजकीय मत देणं जरा अवघड होऊन जातं. मी राजकीय व्यासपीठावर केवळ एक मित्र म्हणून तिथे असतो. माझं मत विचाराल तर मी शिक्षणाचा आईचा घो हा सिनेमा काढला होता. मला मुलांवर अभ्यासाचा काय दबाव असतो हे माहित आहे. त्यांच्यावर तिसरा विषय लादायचा का? माझं म्हणणं आहे की तुम्हाला हिंदी पहिली पासून शिकवायची आहे तर शिकवा. पण जर मला फक्त दोनच भाषा हव्या आहेत तर मला तशी मुभा असावी. ज्यांना हवी असेल त्यांना घेऊद्या. हिंदी विरुद्ध असं काही नाही पण मुलांवर एका जास्तीच्या भाषेचा बोजा कशाला टाकायचा?"