महेश मांजरेकर (mahesh manjrekar) हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. महेश मांजरेकरांना आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. याशिवाय महेश मांजरेकर यांनी वास्तव, काकस्पर्श, फक्त लढ म्हणा, अस्तित्व, विरुद्ध अशा सिनेमांचं दिग्दर्शनही केलंय. महेश मांजरेकर यांच्या सिनेमांमधून विविध मराठी कलाकार पुढे आले आणि इंडस्ट्रीत लोकप्रिय झाले. अशातच महेश मांजरेकर इंडस्ट्रीत ग्रुपिझम करतात का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, मांजरेकरांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे.
महेश मांजरेकर इंडस्ट्रीत ग्रुपिझम करतात?
महेश मांजरेकर इंडस्ट्रीत ग्रुपिझम करतात का? असा प्रश्न लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत विचारला असता ते म्हणाले की, "हो, करतोच ना मी! त्यात लाजायचं काय.. मी वेगवेगळे चेहरे आधीपासून घेतले आहेत. ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं? मी पहिल्यापासून वेगवेगळे कलाकार घेतले आहेत. तुम्ही लिस्ट काढा आणि कोणाकोणाला घेतलंय बघा. मी त्या त्या भूमिकेला बरे वाटलेल्या सर्व कलाकारांना कास्ट केलंय. आणि मराठीच कलाकार घेतले आहेत. हिंदीमध्येही मी मराठीच कलाकार घ्यायचो."