Join us  

"आज तो नाही याचं कारण तो स्वत:च आहे" लक्ष्याचे चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 11:30 AM

सुपरस्टार झाल्यावर त्याची जीवनशैलीच अशी झाली होती. त्याला खरंतर आध्यात्माची गरज होती. पण हे त्याला कसं सांगावं मला कळत नव्हतं.

मराठी सिनेसृष्टी नावारुपाला आणण्यासाठी हातभार लावणाऱ्या अनेक दिग्गज अभिनेत्यांपैकी एक म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde). त्यांच्या विनोदाच्या अचूक टायमिंगला कोणीच आव्हान देऊ शकत नव्हतं. खूप कमी वर्षात त्यांनी एकापेक्षा एक चित्रपट केले. हिंदीतही काम केलं. मात्र व्यसन, आजार या कारणांमुळे त्यांचं 2004 साली वयाच्या 50 व्या वर्षी निधन झालं. लक्ष्मीकांत यांच्यावर ही वेळ आली त्याला तोच जबाबदार असल्याची खंत त्यांचे चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डे (Purushottam Berde) यांनी व्यक्त केली आहे.

पुरुषोत्तम बेर्डे हे दिग्दर्शक, निर्माते आहेत. नुकतंच त्यांनी सिनेमागल्लीला मुलाखत दिली. यामध्ये ते म्हणाले, "लक्ष्याचं आज आपल्यात नसणं हे माझ्यासाठी मोठं नुकसान आहे.  त्याच्या मनात काय आहे हे मला काहीही न बोलता कळायचं. त्याचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. तो मला म्हणाला होता तू तुझी स्क्रीप्ट घेऊन निर्मात्यांकडे जात नाहीस. तू हिंदीत यायची गरज आहे. मी त्याला सांगितलं होतं तू माझा वशिला कुठे लावायचा नाहीस."

त्याने स्वत:लाच संपवलं

ते पुढे म्हणाले, "त्याने हळूहळू स्वत:ला संपवलं. तो खूप डॉमिनेटिंग होता. कोणाचंच ऐकायचा नाही. मी त्याला कधीच सांगू शकलो नाही की तू या या गोष्टींपासून लांब राहा. सुपरस्टार झाल्यावर त्याची जीवनशैलीच अशी झाली होती. त्याला खरंतर आध्यात्माची गरज होती. पण हे त्याला कसं सांगावं मला कळत नव्हतं. या क्षेत्रात आध्यात्म खूप आवश्यक आहे. अशोक सराफ हे किती प्रोफेशनल आहेत. निवेदिता त्यांच्या गोष्टींची काळजी घेते. लक्ष्मीकांतने कधीच ऐकलं नाही. बायकोचंही ऐकलं नाही. लक्ष्मीकांत स्वत:च सगळे निर्णय घ्यायचा. ऑन द स्पॉट अॅडिशन घेणे हा त्याचा गुण होता. पण त्याने आपल्या या गुणाचा योग्य तिथे फायदा घेतला नाही. पण तो आयुष्यात कोणालाही सरेंडर झाला नाही. आज त्याचं नसणं हे सगळ्यात मोठं नुकसान. याचं कारणही तो स्वत:च आहे."

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेमराठी अभिनेतामराठी चित्रपटपरिवार