किफचा धमाकेदार जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 16:28 IST
कल्याण शहराची नवीन ओळख ठरलेल्या 'कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल' म्हणजेच 'किफ'च्या रविवारी झालेल्या देखण्या आणि दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने पुन्हा ...
किफचा धमाकेदार जल्लोष
कल्याण शहराची नवीन ओळख ठरलेल्या 'कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल' म्हणजेच 'किफ'च्या रविवारी झालेल्या देखण्या आणि दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने पुन्हा एकदा कल्याणकरांची मने जिंकली. या उद्घाटनाच्या संध्याकाळच्या सोहळ्यात पेश झालेल्या एकाहून एक सरस अशा अदाकारींनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.तंबूतील सिनेमाचे सकाळी थाटा माटात उद्घाटन झाल्यानंतर संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या उद्घाटन सोहळ्याकडे रसिक प्रेक्षक डोळे लावून बसले होते. त्यांच्या अपेक्षेला खरे उतरत किंबहुना कांकणभर सरस असा हा उद्घाटन सोहळा ठरल्याचे दिसून आले. सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील आणि त्यांच्या टिमने सादर केलेल्या उत्कृष्ट नृत्यविष्काराने या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्याला अप्रतिम अशी साथ दिली ती सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अमृता नातू यांच्या सुरेल आवाजातील सुपरहिट गाण्यांनी. त्या जोडीला शर्मिला शिंदेची मराठी गाण्यांवरील रोमँटिक मेलोडी, स्मिता तांबेने सादर केलेली ठसकेबाज आणि दिलखेच अदांची लावणी, नकुल घाणेकरने सादर केलेले चांगभलं, हे राजे गाण्यांवरील नृत्य, नोटबंदीवर भाष्य करणारे आणि अस्सल ग्रामीण भाषेचा बाज असणाऱ्या कॉमेडी स्किटने या सोहळ्याला चार चाँद लावले. तर पोशाखांच्या विविध पद्धतींवर आधारित असणाऱ्या 'फॅशन शो'नेही चांगली दाद मिळवली. सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी केलेल्या खुसखुशीत सुत्रसंचलनही लक्षणीय ठरले. कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलच्या आंतरराष्ट्रीय मान्यतेसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत खासदार कपील पाटील यांनी व्यक्त केले. 'किफ'च्या संध्याकाळच्या सोहळ्याचे खासदार कपील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या फिल्म फेस्टीव्हलचे आयोजक संदीप गायकर आणि दिग्दर्शक विनोद शिंदे यांचे खासदार पाटील यांनी विशेष कौतुक करताना हे मत व्यक्त केले. याआधी झालेल्या फिल्म फेस्टीव्हलप्रमाणेच हा सोहळाही तितकाच दिमाखदार आणि भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आल्याचे दिसून आले. पुढील ४ दिवस म्हणजे गुरुवारपर्यंत कल्याणकर रसिकांना एकापेक्षा एक बहारदार कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.दरम्यान आयोजक संदीप गायकर आणि सामाजिक कार्यकर्ते जतिन प्रजापती यांनी दाखविलेल्या सामाजिक भानामुळे डम्पिंग ग्राऊंडवरील मुलांनीही या फिल्म फेस्टीव्हलच्या उद्घाटन सोहळ्याचा आनंद लुटल्याचे दिसून आले. आयुष्यात पहिल्यांदाच आपण इतका भव्य स्वरूपातील कार्यक्रम पाहिला. त्याबाबतच्या भावना आम्हाला शब्दांत व्यक्त करणे कठीण असल्याची प्रतिक्रीया या मुलांनी दिली. मात्र त्यांच्या डोळ्यांतून आणि चेहऱ्यावरील निरागस हास्यातून त्यांचा आनंद हा जणू काही गगनात मावत नसल्याचेच जाणवत होते.