Join us

"मी अजूनही तुला स्थिरता देऊ शकलेलो नाही...", लग्नाच्या वाढदिवशी केदार शिंदेंची पत्नीसाठी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 10:12 IST

मी अजूनही वेड्या कल्पनांच्या मागे धावतो अन् तू...", केदार शिंदेंची सोशल मीडिया पोस्ट

दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा 'झापुक झुपूक' सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. 'बिग बॉस ५'चा विजेता सूरज चव्हाणला घेऊन त्यांनी हा सिनेमा काढला. सिनेमा २ कोटींची कमाई केली. केदार शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत आहेत. भरत जाधव, अंकुश चौधरीसोबत त्यांनी गाजलेल्या नाटकाचं, सिनेमांचं दिग्दर्शन केलं. या प्रवासात त्यांना अनेकदा अडचणींनाही सामोरं जावं लागलं. तेव्हा त्यांची पत्नी कायम त्यांच्यासोबत होती. आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पत्नीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

केदार शिंदे यांनी पत्नीसोबत एक फोटो शेअर केला. यामध्ये केदार शिंदे यांच्या हाताला दुखापत झालेली दिसत आहे. ते लिहितात,"असंख्य चांगले फोटो आहेत. पण आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हाच फोटो टाकावासा वाटला. तू गेली २९ वर्षे सोबत आहेस. तू माझ्या अडचणीच्या काळात खंबीरपणे उभी राहतेस. याही फोटोत माझ्या चेहऱ्यावर जे frustrating भाव आहेत आणि तुझ्या चेहऱ्यावरचा जो शांत भाव आहे, तो आपल्या दोघांच्या स्वभावातला फरक सांगून जातो.."

ते पुढे लिहितात,"मी अजूनही वेड्या कल्पनांच्या मागे धावतो आणि तू नेहमीच माझ्या वेडेपणाला साथ देतेस. यशात तू कधीच पुढे येत नाहीस. अपयशात मात्र ढाल होऊन संरक्षण करतेस. मी मात्र अजूनही तुला स्थिरता देऊ शकलेलो नाही. तू मात्र माझ्या अस्थिरतेला सवयीचं करून घेतलंयस. नेहमीच अशा पोस्टमधून तुला खात्री देतो. पण पूर्ण काही करत नाही. तरीही पुढच्या माझ्या वेडेपणात तू अशीच सोबत असशील, हे ठाऊक आहे. तेव्हाही असाच working फोटो कुणीतरी काढेल. पण तो टाकून पुन्हा हेच सगळं मी लिहू नये, हीच स्वामी चरणी प्रार्थना."

टॅग्स :केदार शिंदेमराठी चित्रपट