Join us  

'मराठी पोरी' सातासमुद्रापार करणार कल्ला! 'झिम्मा २' परदेशातही होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 3:26 PM

'झिम्मा २'ची क्रेझ पाहता आता हा सिनेमा परदेशातही प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या झिम्माचा हा सीक्वल आहे. झिम्मानंतर या चित्रपटाच्या सीक्वलच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. अखेर २४ नोव्हेंबरला 'झिम्मा २' सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. सात बायकांच्या रियुनियनची गोष्ट सांगणारा हा सिनेमा पाहण्यासाठी खासकरुन महिला प्रेक्षक वर्ग सिनेमागृहात गर्दी करत आहे. 'झिम्मा २'ची क्रेझ पाहता आता हा सिनेमा परदेशातही प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

प्रेक्षकांचा लाडका 'झिम्मा २' ओमान आणि बाहरेन या देशात प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मराठी पोरी सातासमुद्रापार कल्ला करताना दिसणार आहेत. ओमान आणि बाहरेन या देशातील काही शहरांमध्ये 'झिम्मा २'चे शो लागणार आहेत. याबाबत एक व्हिडिओ हेमंत ढोमेकडून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत हेमंत ढोमे, क्षिती जोग आणि सिद्धार्थ चांदेकर परदेशातील या शोची माहिती देताना दिसत आहेत. 

'झिम्मा २'मध्ये सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू आणि सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. प्रदर्शनाआधीच या चित्रपटातील गाणी प्रचंड व्हायरल झाली होती. या सिनेमाने अवघ्या तीनच दिवसांत बॉक्स ऑफिसवर ४ कोटींची कमाई केली. 

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमराठी अभिनेतामराठी चित्रपटसिनेमा