Join us

जय हनुमान' फेम राजप्रेमी बनले निमार्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 16:35 IST

१९९७ सालचा जय हनुमान आठवतो का? आपल्या शेपटीने रावणाची लंका जाळणा-या या अंजनीपुत्राला त्याकाळात लोकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले ...

१९९७ सालचा जय हनुमान आठवतो का? आपल्या शेपटीने रावणाची लंका जाळणा-या या अंजनीपुत्राला त्याकाळात लोकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले होते. तो हनुमान साकारणारा अभिनेता म्हणजेच वृंदावन या मराठी सिनेमाचे निमार्ते राजप्रेमी!  आजही राजप्रेमी यांची  'जय हनुमान' मधली भूमिका लोक विसरू शकलेले नाही. राजप्रेमी यांनी आतापर्यंत दक्षिण आणि हिंदी चित्रपट तसेच मालिकांत आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे, मात्र आता ते प्रथमच एका निर्मात्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'वृंदावन' या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी प्रथमच निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. मराठी भाषेवर त्यांचे प्रेम असून, या मराठी मातीत आपली जढणघढण झाल्याचे ते सांगतात. त्यामुळे मराठी सोबत विशेष ऋणानुबंध जोडले गेले असल्याचे राजप्रेमी यांनी सांगितले.    'मी स्वत: अभिनेता असून पहिला सिनेमा हा बनवायचा तो मराठीतूनच असा माझा हट्ट होता, मी महाराष्ट्रात वाढलो राहिलो त्यामुळे मराठी सिनेमा करायचा मी ठरवलं.'' असे राजप्रेमी यांनी सांगितले. शिवाय हा सिनेमा बनवताना प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजाचे सहाय्य आपणास मिळाल्याचे ते पुढे म्हणतात. अशोक सराफ, महेश मांजरेकर, शरद पोंक्षे यांच्याकडे मी त्यांच्या व्यक्तिरेखा घेऊन गेलो असता त्यांनी तात्काळ मला होकार कळवला. विशेष म्हणजे वृंदावन सिनेमाची कास्टिंग कोणत्याही आॅडिशन प्रकारातून गेली नसून. ह्या सिनेमातील कलाकार एकमेकांच्या आपुलकीने आणि  विश्वासाने  एकत्र आली असल्याचे राजप्रेमी यांनी सांगितले. वृदावन या सिनेमाची 'रिअलस्टिक फिल्म कंपनी' या बॅनरखाली निर्मिती करण्यात आली असून राजप्रेमी यांसोबत संदीप शर्मा, सुनील खांद्पूर आणि जिगर कडकिया यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे. तर अनघा कारखानीस आणि अमित कारखानीस यांनी सहनिर्मितीची धुरा सांभाळली आहे. यात राकेश बापट, वैदेही परशुरामी आणि पूजा सावंत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतील. एन्टरटेन्मेंटचा भरपूर मसाला, ड्रामा, आणि अ‍ॅक्शन असलेला हा सिनेमा येत्या ८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.