Join us

"शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली...", मधुगंधा कुलकर्णीची देशभक्तीवरील पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 10:31 IST

Madhugandha Kulkarni : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी हिने सोशल मीडियावर देशभक्तीवर आधारीत पोस्ट शेअर केली आहे.

काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्यांना चांगलाच धडा शिकवला. मात्र, भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. पाकिस्तान ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारताने त्यांचे हे सगळे हल्ले परतवून लावले आहेत. भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑपरेशन सिंदूरचे आणि सैन्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. कलाकार मंडळीदेखील यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. दरम्यान मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी (Madhugandha Kulkarni) हिने सोशल मीडियावर देशभक्तीवर आधारीत पोस्ट शेअर केली आहे. 

मधुगंधा कुलकर्णी हिने इंस्टाग्रामवर तिरंग्याचा फोटो शेअर करत लिहिले की, जयहिंद! शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. देशभक्तीचं वार अंगात भरलं आहे. माझा देश, माझा अभिमान. बेंबीच्या देठा पासून ओरडावसं वाटतंय! वंदे मातरम्! आय लव्ह इंडिया. तिच्या या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. जय हिंद अशी कमेंट नेटकरी करत आहेत. 

वर्कफ्रंटछोटा पडदा ते रुपेरी पडदा असा प्रवास करणारी मराठी अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी जुळूनी येती रेशीमगाठी या मालिकेतून घराघरात पोहचली. ती अभिनेत्री व्यतिरिक्त उत्तम लेखिकादेखील आहे. तसेच तिने पती दिग्दर्शक परेश मोकाशी याच्यासोबत मिळून अनेक मराठी सिनेमाची निर्मिती देखील केली आहे. 'नाच गं घुमा', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'वाळवी', 'चि. व चि. सौ. का.' आणि 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' असे हटके चित्रपट या जोडीने दिले आहेत. 

टॅग्स :पहलगाम दहशतवादी हल्ला