Join us  

'गरज भासल्यास मनसे क्रांती रेडकर यांच्या पाठिशी उभी राहणार', अमेय खोपकरांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 5:30 PM

'क्रांती रेडकर म्हणाल्या होत्या की कोणीच पुढे येत नाही. पण गरज भासल्यास क्रांती रेडकर यांच्या पाठिशी मनसे उभी राहिल', असे अमेय खोपकर म्हणाले.

नार्कोटिक्स सेंट्रल ब्युरो (NCB)चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या बहिणीवर होत असलेल्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पत्रकार परीषद घेण्यात आली. त्यावेळी गरज भासल्यास मनसेक्रांती रेडकर यांच्या पाठिशी उभी राहणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीच्या टीमने मुंबईतील क्रुझवर ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केला आणि यावेळी त्यांनी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनला अटक केली. समीर वानखेडे हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. 

अमेय खोपकर पत्रकार परिषदेत म्हणाले की,  क्रांती रेडकर म्हणाल्या होत्या की कोणीच पुढे येत नाही. पण गरज भासल्यास क्रांती रेडकर यांच्या पाठिशी मनसे उभी राहिल. मागील काही दिवसांपासून एनसीबीवर टीका होत आहे. एकीकडे बॉलिवूडमधील कलाकार शाहरूख खानला पाठिंबा दर्शवत आहेत. तर दुसरीकडे एनसीबीच्या बाजूने कोणीच उभे नाही. एनसीबीवर टीका करणाऱ्यांवर क्रांतीने सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून सडेतोड उत्तरे दिले होते. त्याचप्रमाणे एनसीबीच्या कामाचे कौतुक करण्यांचे आभार मानले होते. या पोस्टमध्ये क्रांती रेडकरने म्हटले होते की, तुमच्याकडून सतत मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. विशेष करून एनसीबीचे प्रयत्न, त्यांचे सततचे छापे, निर्भिड मेहनत ओळखल्याबद्दल धन्यवाद. दुर्दैवाने जेव्हा बॉलिवूडचा संबंध येतो तेव्हाच लोक बातम्यांमध्ये रस घेतात. एनसीबी करत असलेल्या स्तुत्य कार्याचे रिपोर्टिंग माध्यमातून सातत्याने होत आहे. गुंडांना पकडण्याचे त्यांचे कामसुद्धा तुम्हा सर्वांपर्यंत पोहचेल आणि तुमचा पाठिंबा, प्रेम असेच वाढत जाईल अशी आशा करते. समाजत असे काही घटक आहेत जे बॉलिवूडवर निशाणा साधल्याचे म्हणत एनसीबीला दोष देत आहे. मी त्यांना विनंती करते की कृपया आकडेवारीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि नंतर टीका करा. ते दररोज संघर्ष करत असताना आपण आपल्या घरी सुरक्षित बसून आपल्या फॅन्सी फोनमधून अशा टिप्पणी देतो. निःस्वार्थपणे देशाची सेवा करण्यासोबत चांगले वागूयात. 

टॅग्स :क्रांती रेडकरमनसेसमीर वानखेडेनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी