अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने रुपेरी पडद्यावर विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. तिने मराठीसह हिंदी आणि साउथच्या सिनेमातही काम केलंय. ती तिच्या प्रोफेशनल लाइफशिवाय वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत येत असते. एका कार्यक्रमात तिने तिच्या लग्नाच्या एका चर्चेबद्दल सांगितलं. ते ऐकून सगळेच हैराण झाले.
'पटलं तर घ्या' या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णीने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने तिच्या लग्नाच्या चर्चांबद्दल सांगितले. ती म्हणाली की, कधीकाळी अशी अफवा पसरली होती की माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि त्यांनी मला राहायला घर दिलं आहे. त्यावेळी मला अनेक जणांचे फोन आले. माझ्या चुलत बहिणीनं देखील मला फोन करून विचारलं की, तुझं खरंच लग्न झालंय का? मी हसले आणि तिला विचारलं की, अगं, मी लग्न केलं असतं तर तुला लग्नाला बोलवलं नसतं का? तू माझी बहीण आहेस. त्यावर तिने म्हटलं की, नाही गं, घाईगडबडीत राहून गेलं असेल.
''मी एका राजकारण्यासोबत लग्न केलं आहे आणि...''
अभिनेत्री पुढे म्हणाली, मग तिने सांगितलं की, लोक असे म्हणत आहेत की मी एका राजकारण्यासोबत लग्न केलं आहे आणि त्यानं मला घर दिलं आहे. हे ऐकून मी काही वेळ चक्रावून गेले. पण त्यामध्ये कोणतंही तथ्य नव्हतं. त्या फक्त अफवा आणि चर्चा होत्या.
वर्कफ्रंटसोनाली कुलकर्णीला मराठी कलाविश्वातील अप्सरा म्हणून ओळखली जाते. तिने 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय. याशिवाय 'नटरंग', 'मितवा', 'हंपी', 'व्हिक्टोरिया एक रहस्य', 'क्षणभर विश्रांती', 'गाढवाचं लग्न' आणि 'पोश्टर गर्ल' यांसारख्या बऱ्याच मराठी सिनेमात ती झळकली आहे.