संतोष जुवेकर (Santosh Juvekar) मराठी सिनेइंडस्ट्रीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. संतोषने मराठीसह हिंदीतही काम केलंय. आता तो लवकरच हिंदी नाटकात झळकणार आहे. या नाटकाचं नाव 'घाशीराम कोतवाल' (Ghashiram Kotwal Play) असून त्याचा पहिला प्रयोग मुंबईत १४ आणि १५ ऑगस्टला पार पडणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने संतोष जुवेकरने एक खास पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.
संतोष जुवेकरने रंगभूमीवरील फोटो शेअर करत लिहिले की, आपल्या घरापासून लांब राहिल्यावर खूप काळानंतर जेंव्हा आपण आपल्या घरी आपल्या आई बाबांच्या घरी येतोना अगदी तस्स वाटतंय..... खूप काळानंतर नाटक करताना अगदी माहेरी आल्या सारखं. स्वतःच्या कामावर कितीही मोठमोठाली टोलेजंग घरं घेतली तरी जे सुख आपल्या आईबाबांच्या घरात असतं त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही आणि माझ्यासाठी नाटक,रंगभूमी अगदी माझ्या आईबाबांच घर माझं हक्काचं घर वाटतं मला. घाशीराम कोतवाल शुभारंभाचे प्रयोग १४ आणि १५ ऑगस्ट बालगंधर्व वांद्रे मुंबई आणि २३ ऑगस्ट एनसीपीए नरिमन पॉईंट मुंबई.
'घाशीराम कोतवाल' नाटकाबद्दल
ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिखित घाशीराम कोतवाल हे मराठी आणि भारतीय रंगभूमीवरचं अत्यंत महत्त्वाचं नाटक. ‘घाशीराम कोतवाल’चा पहिला प्रयोग होऊन (१६ डिसेंबर १९७२) आज ५२ वर्ष पूर्ण झाली आहेत. हे नाटक आजवर सुमारे दहा भारतीय भाषांमधून आणि जगातील तीन भाषांमध्ये सादर झाले आहे. मात्र, हिंदीत हे नाटक व्यावसायिकदृष्ट्या सादर केले गेले नाही. त्यामुळे अभिजात कलाकृतीचं हे कालातीत नाटक हिंदी भाषकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदी रंगभूमीवरही सादर करण्याचा निर्णय घेत लेखक-दिग्दर्शक अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल यांनी या हिंदी नाटकाचे शिवधनुष्य पेलले आहे. यात ज्येष्ठ अभिनेते संजय मिश्रा, मकरंद देशपांडे, उर्मिला कानेटकर आणि संतोष जुवेकर दिसणार आहेत.