Join us  

कौतुकास्पद! दहावीत 99% मिळवूनही अपूर्ण राहिलं असतं तिचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न, डॉ. अमोल कोल्हेंनी स्वीकारलं शैक्षणिक पालकत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 2:34 PM

ऋतुजाच्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.

नुकतेच दहावीचे निकाल लागले. दहावीत चांगले टक्के असतानाही बऱ्याच जणांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे हवे ते शिक्षण घेता येत नाही आणि त्यांचे स्वप्न अपूर्णच राहते. अशावेळी त्यांना कुणीतरी आर्थिक मदतीचा हात देण्याची गरज असते. कारण हीच मुले देशाचे भवितव्य ठरवित असतात. असेच काहीसे बोतार्डे (आमलेवाडी)च्या ऋतुजा प्रकाश आमले या विद्यार्थिनीसोबत घडले. तिला दहावीच्या परीक्षेत 99.60 टक्के गुण मिळाले आणि तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न आहे. अतिशय गरीब कुटुंबातील असलेल्या ऋतुजाच्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.अमोल कोल्हे यांनी या विद्यार्थिनीला डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले. तसेच ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या 'जगदंब प्रतिष्ठान'च्या वतीने तिला अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल भेट देण्यात आला. जुन्नर तालुक्यातील आदिवासी 'पेसा' क्षेत्रातील आमलेवाडी बोतार्डे येथील ऋतुजाने दहावीच्या परीक्षेची तयारी करताना घराच्या भिंतीवर 99.99 टक्के गुण मिळवून डॉक्टर होण्याची इच्छा प्रकट केली होती. त्यानुसार 99.60 टक्के गुण मिळवून पहिले स्वप्न पूर्ण केले.

अतिशय गरीब कुटुंबातील ऋतुजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीचे आवाहन असणारे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर त्याची तातडीने दखल घेऊन अमोल कोल्हे यांनी तातडीने आपल्या 'जगदंब प्रतिष्ठान'चे सदस्य ऋतुजाच्या घरी पाठवले. या कार्यकर्त्यांच्या हस्ते ऋतुजाला ऑनलाईन अभ्यासासाठी आवश्यक असणारा अॅण्ड्रॉईड मोबाईल भेट देण्यात आला. तसेच तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, ग्रामीण भागातील विशेषतः बोतार्डेसारख्या आदिवासी क्षेत्रातील हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील एक मुलगी कष्टाने शैक्षणिक यश मिळवते, डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचा निश्चय करते हीच मुळात कौतुकास्पद बाब आहे. अशा गुणवान व आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची मनिषा बाळगणाऱ्या ऋतुजाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचे भाग्य मला मिळाले ही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे.

टॅग्स :डॉ अमोल कोल्हेदहावीचा निकाल