उपेंद्र लिमये झळकणार समीर पाटीलने दिग्दर्शित केलेल्या सेंटिमेंटल या चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 19:11 IST
समीर पाटीलने पोस्टर बॉइज, पोस्टर गर्ल यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याचे हे दोन्ही चित्रपट बॉ़क्स ऑफिसवर चांगलेच गाजले. ...
उपेंद्र लिमये झळकणार समीर पाटीलने दिग्दर्शित केलेल्या सेंटिमेंटल या चित्रपटात
समीर पाटीलने पोस्टर बॉइज, पोस्टर गर्ल यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याचे हे दोन्ही चित्रपट बॉ़क्स ऑफिसवर चांगलेच गाजले. पोस्टर बॉइज या चित्रपटाची कथादेखील समीरचीच होती. या चित्रपटाच्या यशानंतर हा चित्रपट तेलगु भाषेत बनवला गेला. या चित्रपटाच्या यशानंतर समीर पाटीलने पोस्टर गर्ल हा एक सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला आणि या चित्रपटानेदेखील बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. या चित्रपटातील सोनाली कुलकर्णीच्या अभिनयाचीदेखील चांगलीच चर्चा झाली होती. आता समीर पाटील एक नवा चित्रपट घेऊन येत असून या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपटदेखील कॉमेडी चित्रपटच असणार आहे.उपेंद्र लिमयेने जोगवा, पेज 3, चांदनी बार यांसारख्या चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका साकारल्या आहेत. एक गंभीर अभिनेता म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जाते. पण समीर पाटीलच्या आगामी चित्रपटात उपेंद्र प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. समीर पाटील यांच्या आगामी चित्रपटाचे नाव सेंटिमेंटल असून मुंबई पोलिसांच्या मानसिकतेवर या चित्रपटात कॉमेडीच्या अंगाने भाष्य केले जाणार आहे. या चित्रपटात अशोक सराफ यांचीदेखील प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटात उपेंद्र पोलिसांची भूमिका साकारत आहे. उपेंद्रने याआधी पेज 3 मध्ये एका पोलिसाची भूमिका साकारली होती. अतिशय कडक, शिस्तप्रिय असा हा पोलिस होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. पण सेंटिमेंटलमधली उपेंद्रची भूमिका या भूमिकेपेक्षा अगदी विरुद्ध आहे. ही भूमिका साकारताना खूपच मजा आली असे उपेंद्र सांगतो.