‘देवाणघेवाण’ विषयांची !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 12:13 IST
मराठी दर्जेदार आणि रसिकांच्या काळजाला भिडणा-या विषयांवरील सिनेमांची निर्मिती होतेय.आजवर कधीही हाताळले न गेलेले विषय मराठी सिनेमांमध्ये पाहायला मिळतायत. ...
‘देवाणघेवाण’ विषयांची !
मराठी दर्जेदार आणि रसिकांच्या काळजाला भिडणा-या विषयांवरील सिनेमांची निर्मिती होतेय.आजवर कधीही हाताळले न गेलेले विषय मराठी सिनेमांमध्ये पाहायला मिळतायत. रसिकांना आकर्षित करण्यासाठी मराठी सिनेमात नवनवीन कथा पाहायला मिळतात. या कथा वास्तववादी असतात, तर कधी एखाद्या घटनेवर आधारित. काही सिनेमा हिंदी तर काही दाक्षिणात्य सिनेमांवर आधारित असल्याचेही पाहिलंय. मात्र रसिकांना आकर्षित करण्यासाठी मराठी दिग्दर्शकांनी हॉलीवुडच्या सिनेमांपासून प्रेरणा घेतल्याचीही उदाहरणं आहेत. सातासमुद्रापार रिलीज झालेल्या हॉलीवुडपटांच्या कथा आणि मराठीतील काही गाजलेल्या सिनेमांच्या कथा यांत बरंचसं साम्य असल्याचं आढळलंय. मराठी सिनेमा ( हॅपी जर्नी ) हॉलीवुडचा सिनेमा - ( बेनी एंड जुन)अभिनेता अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री प्रिया बापट यांचा ‘हॅपी जर्नी’ हा सिनेमा काही वर्षांपूर्वी मराठी रसिकांच्या भेटीला आला. सचिन कुंडलकर दिग्दर्शित या सिनेमाची कथा तसंच अतुल कुलकर्णी आणि प्रिया बापट यांनी साकारलेले बहिण भाऊ रसिकांना भावले होते. मात्र याच सिनेमाची कथा हॉलीवुडच्या ‘बेनी एंड जुन’ या सिनेमासारखी असल्याचं बोललं जातंय. एडन क्यून आणि मेरी स्टुअर्ट यांच्या अभिनयानं नटलेला ‘बेनी एंड जुन’ या सिनेमातही भावाबहिणीचं नातं उलगडलं होतं.दोन्ही सिनेमांच्या कथांमध्ये कमालीचं साम्य होतं. मराठी सिनेमा (दे धक्का) हॉलीवुडचा सिनेमा ( लिटील मिस सनशाईन)सध्या ‘दे धक्का’ या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. मराठीत गाजलेला या सिनेमाचा आता हिंदीत रिमेक बनणार आहे. मात्र मराठीतील ‘दे धक्का’ हा सिनेमा एका हॉलीवुडपटावर आधारित होता. हॉलीवुडमध्ये गाजलेल्या ‘लिटील मिस सनशाईन’ या 2006 साली रिलीज झालेल्या सिनेमाची कथा आणि 2008 साली मराठी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या ‘दे धक्का’ या सिनेमाची कथा सारखीच होती.. हॉलीवुडच्या ‘लिटील मिस सनशाईन’ या सिनेमात एका मुलीला सौंदर्य स्पर्धेत सहभागी होता यावं यासाठी बसनं कशारितीने प्रवास करते आणि त्यांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागते हे दाखवण्यात आलं होतं.. तर दे धक्का या सिनेमात बसची जागा टमटमनं घेतली आणि एका डान्स स्पर्धेसाठी मुलीला नेण्याची धावपळ दाखवण्यात आली होती.. मराठी सिनेमा (अगं बाई अरेच्चा) हॉलीवुडचा सिनेमा (व्हॉट वुमेन वॉन्ट)दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘अगं बाई अरेच्चा’ या मराठी सिनेमाची कथाही हॉलीवुडच्या सिनेमापासून प्रेरीत असल्याचं भासतं. हॉलीवुडच्या ‘व्हॉट वुमेन वॉन्ट’ या सिनेमाची कथा आणि ‘अगं बाई अरेच्चा’ या सिनेमाच्या कथेत साम्य आढळतं. ‘व्हॉट वुमेन वॉन्ट’ या सिनेमात अभिनेता मेल गिब्सन याला एक अपघात होतो आणि या अपघातानंतर महिलांच्या मनात काय सुरु आहे हे त्याला आपोआप कळू लागतं. अशीच काहीशी कथा ‘अगं बाई अरेच्चा’ सिनेमाचीही होती.यांत अभिनेता संजय नार्वेकरला कुलदेवतेचा आशीर्वाद मिळतो आणि त्यानंतर महिलांचं मन वाचू लागतो. मराठी सिनेमा ( कायद्याचे बोला) हॉलीवुडचा सिनेमा ( माय कझीन विनी)‘कायद्याचे बोला’ हा मराठीत गाजलेला सिनेमासुद्धा इंग्रजी सिनेमाच्या कथेवर आधारित होता.या सिनेमाची कथा हॉलीवुडमध्ये तयार झालेल्या ‘माय कझीन विनी’ या सिनेमाच्या कथेवरुन घेण्यात आली होती. मराठी सिनेमा ( जरब) हॉलीवुडचा सिनेमा ( टेकन )‘जरब’ या मराठी सिनेमाची कथाही हॉलीवुडच्या सिनेमांवर आधारित होती. ‘जरब’ या सिनेमाची कथा हॉलीवुडच्या ‘टेकन’ या सिनेमाच्या कथेशी साधर्म्य असणारी होती. जरब या सिनेमात अंकुश चौधरी यानं पहिलावहिला मराठमोळा बॉन्ड साकारला होता. यांत एका अपहरणनाट्याचा उलगडा अंकुश करतो.. तर हॉलीवुडच्या ‘टेकन’ या सिनेमातही मुलीची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी नायकाची प्रयत्नांची शर्थ पाहायला मिळते. टेकन या सिनेमातील एक सीनसुद्धा फक्त पात्रं बदलून जसाच्या तसा जरब सिनेमात चित्रीत करण्यात आला होता.. मराठी सिनेमा ( झपाटलेला आणि झपाटलेला-2) हॉलीवुडचा सिनेमा (चाईल्ड्स प्ले) महेश कोठारे यांचा ‘झपाटलेला’ आणि ‘झपाटलेला-2’ हा सिनेमा मराठी रसिकांना चांगलाच भावला.विशेषतः यातील ‘तात्या विंचू’ आणि मनोरंजनाचा मसाला आजही बच्चे कंपनी आणि रसिकांच्या मनात घर करुन आहे.मात्र या सिनेमाची कथाही हॉलीवुडच्या ‘चाईल्ड्स प्ले’ या सिनेमाशी साधर्म्य असलेली होती. हॉलीवुडचा ‘चाईल्ड्स प्ले’ हा भयपट होता तर महेश कोठारे यांनी आपल्या सिनेमात भयपटपेक्षा मनोरंजनावर अधिक भर दिला होता.