Join us

'दुनियादारी' सिनेमा बंद झाला असता कारण...; स्वप्नील जोशीने सांगितला भावुक किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 14:45 IST

स्वप्नील जोशीने 'दुनियादारी' सिनेमाच्या वेळेस घडलेल्या दुःखद घटनेचा लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत उलगडा केलाय (swapnil joshi, duniyadari)

२०१३ साली आलेला 'दुनियादारी' सिनेमा सर्वांच्या पसंतीस उतरला. आजही या सिनेमाचा स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग आहे. मराठी मनोरंजन विश्वातील एक गाजलेला सिनेमा म्हणून संजय जाधव दिग्दर्शित 'दुनियादारी' सिनेमाला ओळखलं जातं. या सिनेमात स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे, वर्षा उसगांवकर या लोकप्रिय कलाकारांनी भूमिका साकारली. सिनेमात श्रेयसची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता स्वप्नील जोशीने 'दुनियादारी'च्या मेकिंगच्या वेळी आलेल्या अडचणींबद्दल खुलासा  केला.

'दुनियादारी' करताना आल्या असंख्य अडचणी पण...  

स्वप्नील जोशी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की,  "दुनियादारी करताना असंख्य अडचणी आल्या. आपल्या सगळ्यांचाच अत्यंत लाडका अभिनेता आनंद अभ्यंकर. तो दुनियादारीच्या शूटमधून निघाला आणि तो गेला. त्यानंतर टेक्निकली आम्ही सिनेमा बंद केला होता. एक धडधाकट माणूस गेला. अत्यंत लाडका नट अन् मित्र गेला. तो माझा एवढा जवळचा मित्र नव्हता. पण संज्याचा (संजय जाधव) अत्यंत लाडका मित्र होता. त्यामुळे आमचा पिक्चर बंद पडला होता. अशा किती अडचणी सांगू."

स्वप्नील पुढे म्हणाला की, "प्रत्येक अडचणीवर काही ना काही तोडगा निघत गेला. आम्हाला खात्री होती की, या चित्रपटाचं काहीतरी वेगळं घडतंय. आम्ही नेहमी असं गंमतीत म्हणतो की, शिरवळकर वरुन बघत होते सिनेमा बघताना. दुनियादारीचे ते लेखक आहेत. शिरवळकर वरुन आशीर्वाद देत होते आम्हाला. जे त्यांना आवडत होतं ते ओके करत होते आणि जे आवडत नव्हतं त्यात विघ्न आणून ते बंद करायला लावत होते."

स्वप्नील शेवटी म्हणाला की, "त्यामुळे असं आमचं ठाम मत आहे की, शिरवळकरांनी हा सिनेमा आमच्याकडून पूर्ण करुन घेतला. जोपर्यंत त्यांच्या पसंतीचं कास्टिंग होत नव्हतं तोपर्यंत सिनेमा बनत नव्हता. जोवर त्यांच्या पसंतीचं स्क्रीप्ट ओके होत नव्हतं तोवर सिनेमा शूट होत नव्हता. असे कितीतरी किस्से आहेत. त्यामुळे दुनियादारीचं काहीतरी घडेल असं नक्की वाटत होतं. पण असं काहीतरी घडेल असं वाटलं नव्हतं."

टॅग्स :स्वप्निल जोशीसंजय जाधवअंकुश चौधरीमराठी चित्रपटमराठी अभिनेता