Join us

'श्श… घाबरायचं नाही' नाटकातून पुन्हा एकत्र येणार डॉ. गिरीश ओक आणि डॉ. श्वेता पेंडसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:40 IST

Shh…Ghabrayacha Nahi : 'श्श… घाबरायचं नाही' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग बुधवार, ३१ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता ओपेरा हाऊस, मुंबई येथे सादर होणार आहे.

मराठी साहित्य, रंगभूमी आणि सिनेविश्वातील एक तेजस्वी, अष्टपैलू नाव म्हणजे रत्नाकर मतकरी. त्यांच्या बहुआयामी लेखनशैलीला आणि स्मृतीला सलामी देण्यासाठी बदाम राजा प्रॉडक्शन सादर करत आहे ‘श्श… घाबरायचं नाही’.(Shh…Ghabrayacha Nahi). या विशेष नाट्यपूर्ण सादरीकरणात ‘पावसातला पाहुणा’ आणि ‘जेवणावळ’ या रत्नाकर मतकरी लिखित दोन गूढ कथांचं रंगमंचीय सजीव रूप प्रेक्षकांसमोर उभं राहणार आहे. या कथा वाचनापुरत्या किंवा केवळ ऐकण्यापुरत्या न राहता, अभिनय, आवाज, प्रकाशयोजना आणि दृश्य सादरीकरणाच्या माध्यमातून एक थेट अनुभव देणाऱ्या रूपात साकारल्या जातील. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग बुधवार, ३१ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता ओपेरा हाऊस, मुंबई येथे सादर होणार आहे.

या नाट्यपूर्ण सादरीकरणाचं दिग्दर्शन ज्येष्ठ आणि कसलेल्या दिग्दर्शक विजय केंकरे करत आहेत. केंकरे यांचं दिग्दर्शन म्हणजे तांत्रिक सफाईसोबतच कथेमागील सूक्ष्म भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची एक सर्जनशील प्रक्रिया. त्यांच्या दिग्दर्शनामुळे मतकरींच्या कथा केवळ ऐकण्यापुरत्याच न राहता, अंतर्मनात थेट पोचणाऱ्या दृश्य अनुभवात परिवर्तित होतात.

या उपक्रमाच्या निर्मितीमागे आहेत ‘बदाम राजा प्रॉडक्शन’ ही नव्या विचारांची, पण संवेदनशील निर्मिती संस्था. जुनं, कालातीत आणि दर्जेदार साहित्य नव्या पिढीसमोर नव्या माध्यमातून सादर करायचा त्यांचा दृष्टिकोन ‘श्श… घाबरायचं नाही’मध्ये प्रकर्षाने जाणवतो. हे नाट्य केवळ मनोरंजन न राहता, साहित्य आणि रंगभूमी यांचा विलक्षण संगम घडवणारं सांस्कृतिक सूत्रधार ठरतं.

कलाकार मंडळीदेखील यथायोग्य. पुष्कर श्रोत्री – अभिनय, दिग्दर्शन आणि आवाज अशा तीनही पातळ्यांवर ठसा उमटवणारा बहुआयामी कलाकार. डॉ. श्वेता पेंडसे, जी प्रगल्भ अभिनय आणि आवाजातील भावनिक सूक्ष्मता सहजतेने साकारते. आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. गिरीश ओक, जे रंगभूमीवरच्या त्यांच्याच सहजतेने आजही समोरचं चित्र भारून टाकतात.

या सादरीकरणाचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे डॉ. गिरीश ओक आणि श्वेता पेंडसे हे दोघंही पुन्हा एकत्र रंगभूमीवर झळकणार आहेत. त्यांच्या आवाजात, त्यांच्या अस्तित्वात एक वेगळीच रसायनं आहे, जी प्रेक्षकांना त्या गूढ कथांच्या थेट केंद्रबिंदूवर नेतं. दोन्ही कलाकार आपल्या या नव्या कलाकृतीसाठी आणि एका वेगळ्या प्रयोगासाठी फार उत्सुक आहेत.

टॅग्स :गिरिश ओक