Join us  

'प्रेमासाठी वाट्टेल ते'मधील रतन आठवतेय ना...!, आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 7:00 AM

१९८७ साली प्रेमासाठी वाट्टेल ते हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता.

१९८७ साली प्रेमासाठी वाट्टेल ते हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सुधीर जोशी, पद्मा चव्हाण, कांचन अधिकारी, प्रकाश भेंडे आणि उमा भेंडे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाची निर्मिती उमा प्रकाश भेंडे आणि दत्ता केशव यांनी दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात रतनची भूमिका अभिनेत्री आणि निर्माती कांचन अधिकारी यांनी साकारली होती.

कांचन अधिकारी यांनी ‘बबन प्रभू’ लिखित ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ या पहिल्या व्यावसायिक नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. या पहिल्याच नाटकामुळे त्यांना भक्ती बर्वे, आत्माराम भेंडे, दिलीप प्रभावळकर, माधव वझे या कलाकारांसह काम करण्याचा अनुभव मिळाला. या नाटकातील भूमिकेमुळे ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ या प्रकाश भेंडे यांच्या चित्रपटात त्यांना संधी मिळाली. अशोक सराफ या दिग्गज कलाकाराबरोबर नायिका म्हणून या चित्रपटात काम केले. 

कांचन अधिकारी यांनी बाबा सावंत यांच्या ‘हिचं काय चुकलं?’ या चित्रपटात रंजना, विक्रम गोखले यांच्यासह भूमिका केली होती. हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. किरण शांताराम यांची निर्मिती असलेल्या, गिरीश घाणेकर दिग्दर्शित ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ या चित्रपटातही काम केले. १९८९ साली आलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी मार्कंड अधिकारी यांच्यासोबत लग्न केले.

लग्नानंतर काही काळ अभिनयक्षेत्रापासून दूर राहिल्यानंतर कांचन अधिकारी यांनी १९९५ साली ‘दामिनी’ या अत्यंत लोकप्रिय मालिकेच्या दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. पंधराशेपेक्षा जास्त भाग चाललेल्या या मालिकेने अनेक पुरस्कारही मिळवले.

 कांचन अधिकारी यांनी मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटातही भूमिका केल्या. दादा कोंडके यांच्या ‘आगे की सोच’ या हिंदी चित्रपटात शक्ती कपूर, स्वप्ना या कलाकारांबरोबर सहजतेने अभिनय केला. ‘ये जो है जिंदगी’, ‘बनते बिगडते’, ‘और भी है राहें’, ‘तितलियॉं’ यासारख्या हिंदी मालिकांमध्ये अभिनय केलाच, शिवाय ‘अभी तो मै जवान हूॅं’, ‘संबंध’, ‘डोली लेके आयी है दुल्हनियॉं’, ‘हॅंसी वो फसी’ या हिंदी मालिकांचे दिग्दर्शनही केले.

‘श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेड’ या आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात सक्रिय सहभाग घेऊन ‘मी मराठी’ या मराठी वाहिनीच्या कार्यक्रमांच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. सत्य घटनेवर आधारित २०१८ मध्ये आलेला ‘इंडिअन नेव्हर अगेन निर्भया’ हा हिंदी चित्रपट त्यांनी प्रोड्यूस तर केलाच आणि यात अभिनय देखील केला आहे. रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या माध्यमांतून अभिनय आणि दिग्दर्शनाबरोबर ‘ध्रुव सेवाभावी संस्थे’च्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांमध्येही कांचन अधिकारी यांचा सहभाग असतो.

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेअशोक सराफ