'गार्गी' या गाजलेल्या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक आशिष उबाळे (Ashish Ubale) यांनी काल १७ मे रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास आत्महत्या केली. ते मूळचे नागपूरचे होते. काल संध्याकाळी नागपूरमधील रामकृष्ण मठात त्यांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. कर्जाच्या ओझ्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांनी व्हॉट्सअॅप वर नोटही लिहिली होती अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
दिग्दर्शक आशिष उबाळे हे मूळचे नागपूरचे होते. नागपूर शहरातील प्रतापनगर भागात ते वडिलोपार्जित घरात राहत होते. २५ वर्षांपूर्वी ते दिग्दर्शन क्षेत्रात आले. त्यासाठी नागपूरहून मुंबई गाठली. 'गार्गी','आनंदाचे डोही' या मराठी सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलं. शिवाय काही मराठी मालिकाही केल्या. काही वर्षांपूर्वी नागपूरमधील घर विकून ते आईवडिलांसह मुंबईत राहायला आले. यादरम्यान त्यांच्यावर बरंच कर्ज झालं. दिग्दर्शनात अपेक्षित यश मिळू शकलं नाही आणि कर्ज वाढत गेलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल ते मुंबईवरुन नागपूरमध्ये आले. त्यांचा लहान भाऊ सारंग उबाळे रामकृष्ण मठात सेवेकरी आहे. भावाच्या सांगण्यावरुन ते मठातील एका खोलीत राहिले. दुपारचं जेवण केलं. संध्याकाळी चहा घेण्यासाठी भाऊ बोलवायला गेला असता त्याला आशिष यांनी गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचा व्हॉट्सअॅप मेसेज त्यांनी स्वत:लाच पाठवला होता. कर्जाच्या ओझ्यामुळे ते नैराश्यात गोते. याप्रकरणी धंतोली पोलिस अधिकचा तपास करत आहेत.
आशिष उबाळे यांच्या कामाविषयी
आशिष उबाळे हे उत्तम दिग्दर्शक आणि लेखकही होते. त्यांच्या २००९ साली आलेल्या'गार्गी' या सिनेमाची स्क्रीनिंग कार्ल्सबर्ग आंतरराष्ट्रीय सिने महोत्सवातही झाली होती. याशिवाय त्यांनी 'अग्नी','एका श्वासाचे अंतर','गजरा','चक्रव्यूह' या माविकांचं दिग्दर्शन केलं. तसंच 'प्रेमासाठी वाट्टेल ते','बाबुरावला पकडा' हे सिनेमेही दिग्दर्शित केले.