Join us

"दशावतारचं शूटिंग करण्याआधीच मला चिकनगुनिया झाला, त्यामुळे..."; दिलीप प्रभावळकरांनी सांगितला खास किस्सा

By देवेंद्र जाधव | Updated: September 12, 2025 17:01 IST

दिलीप प्रभावळकरांनी वयाच्या ८१ व्या वर्षी दशावतार सिनेमातून थक्क करणारा अभिनय केलाय. पण यामागे दिलीप यांचा संघर्ष फार मोठा होता हे दिसतंय.

'दशावतार' सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. त्यामुळेच 'दशावतार' सिनेमा रिलीजआधीपासूनच चर्चेत आहे. या सिनेमात दिलीप प्रभावळकर प्रमुख भूमिकेत आहेत. दिलीप प्रभावळकरांचे विविध लूक्स आणि त्यांचा अभिनय या सर्व गोष्टींची चर्चा आहे. 'दशावतार' सिनेमाच्या निमित्ताने दिलीप प्रभावळकर विविध माध्यमात मुलाखती देत आहेत. अशातच एके ठिकाणी मुलाखत देताना दिलीप प्रभावळकर यांनी खास किस्सा सांगितला आहे. 'दशावतार'च्या आधी ते खूप आजारी होते, हा खुलासा त्यांनी केलाय. 

'दशावतार' सिनेमाच्या निमित्ताने दिलीप प्रभावळकर यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत हा खास किस्सा सांगितला. दिलीप म्हणाले, ''या सिनेमाचं शूटिंग सुरु होण्याच्या महिनाभर आधी मला चिकनगुनिया झाला होता. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही काही शूटिंग वगैरे करायचं नाही. माझे त्यावेळी नाटकाचे प्रयोग चालू होते. नाटकाचे प्रयोग करु नका असंही सांगण्यात आलं होतं. तर ती एक थोडीशी अडचण होती. पण स्टिरॉई़ड वगैरे घेऊन मी लवकर बरा झालो. त्यानंतर शूटिंगला हजर झालो. माझ्या मुलाचं काम करणारा सिद्धार्थ मेनन त्याला दिसत होतं की, माझ्या स्नायूंना सूज येतेय. तरीही मी सर्व अॅक्शन वगैरे केली. पाण्याच्या वरती आणि पाण्याच्या खाली अॅक्शन करायची होती.''

अशाप्रकारे दिलीप प्रभावळकरांनी हा खास किस्सा सर्वांना सांगितला. 'दशावतार' सिनेमाचा लेखक सुबोध खानोलकर असून त्याने दिग्दर्शनाची प्रथमच धुरा सांभाळली आहे. गुरू ठाकूर यांनी संवाद आणि गीतलेखन केले आहे. तर ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे.

‘दशावतार ‘ चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबरच सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी यांनी केली आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहेत. या चित्रपटात दिलीप यांच्यासोबतच सिद्धार्थ मेनन, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

टॅग्स :दिलीप प्रभावळकर मराठी अभिनेतामराठी चित्रपट