कोकणातील प्रसिद्ध 'दशावतार' (Dashavatar) आता मोठ्या पडद्यावर येतोय. मराठी कलाकारांची तगडी स्टारकास्ट, एकापेक्षा एक डायलॉग, भयावह अन् रोमांचकारी दृश्य पाहून मराठी प्रेक्षक प्रभावित झाले आहेत. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टारर ‘दशावतार ‘ येत्या १२ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
'दशावतार' चित्रपटाचं पोस्टर, त्याचा पहिला लूक आणि चित्रपटातील पहिलंच गाणं 'आवशीचो घो' यांनी आधीच रसिकांच्या मनात तुफान उत्सुकता निर्माण केलीय. सिनेमाचा ट्रेलर नुकताच आला आहे. दिलीप प्रभावळकरांचा स्क्रीनवरील वावर, त्यांची भेदक नजर पाहून कोणीही थरथर कापेल. कोकणातील इरसाल माणसांचे नमुने , तिथल्या प्रथा परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ म्हणजे ‘दशावतार ‘! कोकणातील समृद्ध निसर्गवैभव, गर्द देवराया, देवरायांचे राखणदार यांची गूढरम्यता म्हणजे दशावतार! कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्री आणि त्याच्या आयुष्यातल्या वादळांची गोष्ट म्हणजे ‘दशावतार ‘ आहे!! अर्थपूर्ण कथा, दमदार अभिनय आणि कर्णमधूर संगीत यांचा अप्रतिम संगम म्हणजेच हा ‘दशावतार’!