एक वेगळ्या थाटणीचा चित्रपट छंद प्रितीचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 09:40 IST
आपल्या कलेवरील प्रेमाखातर वडिलोपार्जित संपत्तीची आशा सोडून आपले आयुष्य कलेला वाहून घेणाऱ्या शाहीराची ही कथा... ज्यात त्याच्या लेखणीतून अवतरलेल्या ...
एक वेगळ्या थाटणीचा चित्रपट छंद प्रितीचा
आपल्या कलेवरील प्रेमाखातर वडिलोपार्जित संपत्तीची आशा सोडून आपले आयुष्य कलेला वाहून घेणाऱ्या शाहीराची ही कथा... ज्यात त्याच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतांवर तितक्याच ताकदीचं नृत्य करणारी चंद्रा त्याला भेटते आणि दोन कलाप्रेमींमध्ये जडलेल्या प्रितीला एक वेगळं वळण लागतं... ‘छंद प्रितीचा’ या चित्रपटाच्यानिमित्ताने पुन्हा एकदा सोंगाड्याची जादू प्रेक्षकांवर होणार आहे ज्याच्या भूमिकेत विकास समुद्रेंना पाहता येणार आहे. आपल्या कलेचा छंद जडलेल्या शाहीराच्या या कथेतून संगीताची लयलूट होणार आहे. जावेद अली आणि केतकी माटेगावकर यांच्या स्वरांनी सजलेलं “आलं आभाळ भरूनं” हे प्रेमगीत तर “निस्ती दारावर टिचकी मारा”, “वाजो पहाटेचे पाच”, “सत्य सांगते” या बेला शेंडे यांच्या आवाजातील फटाकेबाज लावण्या त्याचबरोबर बेला शेंडें – वैशाली सामंत यांच्यात रंगलेला सवाल – जवाब आणि आदर्श शिंदे यांच्या आवाजातील “कोसळली ती वीज” हे गीत आणि आदर्श शिंदे च्या आवाजाने नटलेली “शाहीरी लावणी” अशा कैक लोकगीतांनी नटलेला चित्रपट “छंद प्रितीचा”.... या चित्रपटात एकंदर आठ गाणी आहेत. एन. रेळेकर यांच्या लेखणीतून अवतरलेल्या या गीतांना प्रविण कुवर यांचे सूर लाभले आहेत. कलेच्या उपासकांची कलेवरील श्रद्धा दर्शवणाऱ्या या चित्रपटात शाहिराच्या भूमिकेत दिसणारा हर्ष कुलकर्णी आपल्या कलेसाठी सर्वस्व पणाला लावतो.या चित्रपटात सुबोध भावे, सुवर्णा काळे आणि हर्ष कुलकर्णी सोबतच विकास समुद्रे, शरद पोंक्षे, गणेश यादव, सुहासिनी देशपांडे, अभिषेक कुलकर्णी आणि विशाल कुलथे यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.छंद प्रितीचा या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक एन. रेळेकर यांनी केले असून दिग्दर्शनाबरोबरच कथा – पटकथा – गीतलेखनाची धुराही एन. रेळेकर यांनीच सांभाळली आहे. तर निर्मिती चंद्रकांत जाधव यांनी केली आहे. हा चित्रपट १० नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सुबोध भावे या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याने त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाविषयी उत्सुकता लागली आहे.