शंकर महादेवन यांचं ‘तुतारी चॅलेंज’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 10:55 IST
या गाण्यात प्रचंड उत्साह आणि जोश तर आहेच शिवाय कुणालाही ठेका धरायला लावेल असं संगीत आहे.
शंकर महादेवन यांचं ‘तुतारी चॅलेंज’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
सोशल मीडियावर सध्या तुतारी हे गाणं भलतंच गाजतंय. अवघ्या काही दिवसांत तुतारी या गाण्याला लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्यात. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर प्रसिद्ध गायक आणि दिग्दर्शक शंकर महादेवन यांनी हे गाणं सोशल मीडियावर लॉन्च केलं. बाप्पाचा उत्सव दणक्यात आणि तितक्याच उत्साहात तसंच नव्या जोशात साजरा करण्याच्या उद्देशाने शंकर महादेवन यांनी हे नवं गाणं लॉन्च केलं. या गाण्यात प्रचंड उत्साह आणि जोश तर आहेच शिवाय कुणालाही ठेका धरायला लावेल असं संगीत आहे. पारंपरिक वाद्य, इलेक्ट्रॉनिक म्युझिकचा तडका आणि ताशाची साथ असं सारं संगीताचं मिश्रण करुन साकारलेल्या शंकर महादेवन यांच्या तुतारी या व्हिडीओ गाण्यातून वेगळाच उत्साह संचारतो. त्यामुळेच प्रत्येक गणेश भक्ताच्या पसंतीला हे गाणं पात्र ठरत आहे. गणेश चतुर्थी हा शंकर महादेवन यांचा सगळ्यात आवडता सण आहे. बाप्पाचा उत्सव आनंद, उत्साह घेऊन येतो. त्यामुळे बाप्पाची आराधना यंदा काहीशा वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी शंकर महादेवन यांनी हे तुतारी गाणं बनवलं. हे व्हिडीओ गाणं सोशल मीडियावर लॉन्च होताच अक्षरक्षा धुमाकूळ घातला आहे. रसिकांना आणि विशेषतः गणेशभक्तांना हे गाणं चांगलंच भावतं आहे. या व्हिडीओत खुद्द शंकर महादेवन यांनी बाप्पासमोर ठेका धरला आहे. तुतारी आणि संगीताचं वेगळं एक नातं आहे, त्यामुळेच या गाण्याला तुतारी नाव दिल्याचं सांगणारे शंकर महादेवन आपल्या हातांनी तुतारी दाखवत थिरकत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. अल्पावधीतच या व्हिडीओ गाण्याला मिळालेला हा प्रतिसाद पाहून खुद्द शंकर महादेवनही भारावून गेले आहेत. प्रत्येक मंडळात हे गाणं चांगलंच गाजतंय. शंकर महादेवनही स्वतः सार्वजनिक मंडळात जाऊन हे गाणं वाजवणार आहे. या गाण्याची लोकप्रियता इतकी वाढली आहे की लोक तुतारी वाजवतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. हेच पाहून शंकर महादेवन यांनी नेटिझन्स, फॅन्स आणि गणेश भक्तांना तुतारी चॅलेंज दिलं आहे. या गाण्यावर थिरकत तुतारी व्हिडीओ पोस्ट करण्याचे आव्हान त्यांनी दिलं आहे. हॅशटॅग तुतारी चॅलेंजवर ( #TutariChallenge) वर हे व्हिडीओ अपलोड करण्यास त्यांनी सांगितलं आहे. यातल्या निवडक आणि झक्कास तीन व्हिडीओची निवड खुद्द शंकर करणार आहेत. त्यामुळे आता तुतारीच्या निमित्ताने एक वेगळी स्पर्धा रंगणार आहे.