Join us  

"दुसऱ्या भागात मी मुख्यमंत्री असेन", 'धर्मवीर २'बाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 3:28 PM

'धर्मवीर'नंतर 'धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' मध्ये काय पाहायला मिळणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. आता खुद्द एकनाथ शिंदेंनी याचा खुलासा केला आहे.

मराठी अभिनेता प्रसाद ओक मुख्य भूमिकेत असलेला 'धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट प्रचंड गाजला. शिवसैनिक आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रतिसादानंतर 'धर्मवीर २' ची घोषणा करण्यात आली होती. नुकतंच या सिनेमाच्या शुटिंगचा मुहुर्त सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमात बोलताना शिंदेंनी 'धर्मवीर २'बाबत मोठं विधान केलं आहे.

'धर्मवीर'नंतर 'धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' मध्ये काय पाहायला मिळणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. पहिल्या भागात आनंद दिघेंची अखंड राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. तसेच, त्यामध्ये शेवटी आनंद दिघेंचे निधन झाल्याचे दाखवल्यामुळे आता दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष असणार आहे. आता खुद्द एकनाथ शिंदेंनी याचा खुलासा केला आहे. "दिघेसाहेब असताना मी नगरविकास मंत्री होतो. दुसऱ्या भागात मी मुख्यमंत्री असेन," असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

'धर्मवीर २'च्या मुहुर्त सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी अभिनेता प्रसाद ओकचं कौतुकही केलं. "प्रसादने जीव ओतून या भूमिकेसाठी काम केलं. त्याने आनंद दिघेंना कधी पाहिलं नाही, त्यांना तो कधी भेटलाही नाही. पण, त्याने त्यांची भूमिका उत्तमरित्या साकारली," असं म्हणत एकनाथ शिंदेंनी भर कार्यक्रमात प्रसाद ओकचं कौतुक केलं. 

'धर्मवीर'च्या पहिल्या भागात प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. तर अभिनेता क्षितीश दाते एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत होता. आता दुसऱ्या भागातही प्रसाद ओक दिघेंची तर क्षितीश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणार आहे. 'धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे. २०२४मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

टॅग्स :एकनाथ शिंदेप्रसाद ओक मराठी चित्रपटमराठी अभिनेता