Join us

'दशावतार' सिनेमातील 'रंगपूजा' गाणं भेटीला; अजय गोगावलेंचा आर्त आवाज अन् गुरु ठाकूरचे भिडणारे शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 11:11 IST

'दशावतार' सिनेमातील अजय गोगावलेंच्या आवाजातील रंगपूजा हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं ऐकून डोळ्यात पाणी येईल

मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेला झी स्टुडिओज प्रस्तुत ‘दशावतार’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे वेध प्रेक्षकांना लागले आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील अनमोल ठेवा असलेल्या दशावतार परंपरेला मोठ्या पडद्यावर भव्यतेने मांडणाऱ्या या चित्रपटातील हृदयस्पर्शी ‘रंगपूजा’ ही भैरवी नुकतीच रसिकांच्या भेटीस आली आहे.या गाण्यातून एका निस्सीम कलावंताची कलेवरील नितांत श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची भावना मांडली गेली आहे. 

‘दशावतार’ चित्रपटातील हे गीत म्हणजे कलावंताच्या रंगभूमीवरील कलाप्रवासाला भावपूर्ण अभिवादन आहे. विशेष म्हणजे गीतकार गुरु ठाकूर, गायक अजय गोगावले आणि संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र हे  त्रिकुट प्रथमच या गाण्यात एकत्र आलं असून हे गाणं या चित्रपटाचं, नायक बाबुली मेस्त्रीच्या आयुष्याचं मर्म मांडतं. गुरु ठाकूर यांची अर्थपूर्ण शब्दरचना , त्याला अजय गोगावले यांचे आर्त स्वर यामुळे गाण्याला अनोखा आयाम मिळाला आहे. तर ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांच्या सुमधुर सुरावटींनी गाण्यात खास रंगत आणली आहे. 

गायक अजय गोगावले म्हणाले, ‘’दशावतार नाटकांमध्ये जितके नांदीला महत्व आहे तितकेच ‘रंगपूजा’ ह्या भैरवी भैरवीला! भैरवी झाल्याशिवाय नाटकातील कुठलाही कलावंत आपल्या चेहऱ्यावरील रंग उतरवत नाही. म्हणूनच ‘दशावतार‘ चित्रपटातील ही ‘रंगपूजा’ ही भैरवीसुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण आहे. गुरु ठाकूरच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली ही भैरवी प्रत्येक कलाकाराचं मर्म आहे. ही भैरवी मलाही खूप रीलेट करुन गेली. गुरु ठाकूरचे शब्द नेहमीच भावोत्कटता आणतात. आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्रने त्याला संगीताचं उत्तम कोंदण केलंय. त्यामुळे ती गाताना वेगळं समाधान मला मिळालं. या भैरवी मुळे मीसुद्धा या चित्रपटाचा भाग होऊ शकलो, याचा मला खरोखर आनंद आहे.”

संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणाले, “अजय गोगावले यांच्यासोबत काम करायची माझी खूप आंतरिक इच्छा होती आणि ‘दशावतार’मुळे ती पूर्ण झाली. हा माझ्या संगीतप्रवासातील सर्वात आनंदाचा क्षण आहे.”

गीतकार गुरु ठाकूर म्हणाले, “कलावंताच्या आयुष्यावरचा हा सिनेमा आहे. कुठलीही कलाकृती तुम्ही करता, असं म्हणण्यापेक्षा, त्यासाठी तुमची निवड होणे, हे तुमच्या भाग्योदयात लिहिलेलं असतं, असं मी मानतो. या चित्रपटाचे संवाद, गाणी दिग्दर्शक सुबोध खानोलकरने माझ्याकडून लिहून घेतली आणि एकेक योग जुळत गेले. गीतकाराने फक्त शब्द लिहिणे पुरेसे नसते, तर ते शब्द आणि त्यातील भावना रसिकांपर्यंत पोहोचवणारा आवाज महत्त्वाचा असतो. आणि माझ्या गाण्यांना अजयचा आवाज लाभतो तेव्हा मी आश्वस्त होतो. अजय गोगावलेने आजवर मी लिहिलेली कित्येक गाणी अजरामर केली आहेत. रेकॉर्डिंग स्टुडिओत अजय ही भैरवी गात होता तेव्हा मी आणि सुबोध अक्षरशः हळवे झालो होतो. 

झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’चे लेखन, दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, रवी काळे यांसारखे दिग्गज कलाकार यात भूमिका साकारत आहेत. येत्या १२ सप्टेंबरला ‘दशावतार’ जगभर मोठ्या दिमाखात प्रदर्शित होणार असून, अजय गोगावलेंच्या आवाजातील ‘रंगपूजा’ ही भैरवी  हा या चित्रपटाचा कळसाध्याय आहे!

टॅग्स :दिलीप प्रभावळकर मराठी अभिनेतामराठी चित्रपट