हिंदी चित्रपटांच्या लाटेत महाराष्ट्राचा महासिनेमा ‘दशावतार’ चित्रपटाने आपला गड उत्तम रित्या राखून ठेवला आहे. 'कांतारा’च्या बरोबर आलेल्या बाॅलिवूडच्या चित्रपटांना 'कांतारा'ने धडक दिली असली तरी ‘दशावतार’ने चौथ्या आठवड्यातही आपले स्थान हलू दिलेले नाही. चौथ्या आठवड्यातसुद्धा ‘दशावतार’ दिडशे थिएटर्स आणि सुमारे दोनशेच्या वर शो तुफान गर्दीत सुरु आहेत. हीच मराठीतील सकस कथेची, अर्थपूर्ण मराठी चित्रपटाची आणि सुजाण मायबाप रसिकांच्या प्रेमाची ताकद आहे.
‘दशावतार’ बक्कळ कमाई
‘दशावतार’ सिनेमाच्या कमाईवर नजर टाकली तर, या सिनेमाने २५ कोटींहून अधिकची कमाई केलीय. जगभरात ‘दशावतार’ सिनेमाने २६.४३ कोटींची कमाई केली आहे. ओशन फिल्म्सची निर्मिती आणि झी स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित ‘दशावतार ‘ चित्रपटाने गेले तीन आठवडे थिएटरमध्ये रसिकांचा धो धो वर्षाव पाहिला. आता चौथ्या आठवड्यातही सिनेमाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली आहे.
‘दशावतार’ सिनेमाचे अमेरिकेत शंभरहून जास्त शो होत आहेत तर ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, आखाती देश येथेही ‘दशावतार’ने आपला झेंडा फडकवला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत बऱ्याच काळानंतर हे सळसळते चैतन्य लोकांना अनुभवायला मिळाले. ‘दशावतार’मुळे चित्रपटगृहांनी गणेशोत्सवानंतर लागलीच आपली दिवाळी साजरी केली. कोकणातील अनेक बंद चित्रपटगृहांची दारे ‘दशावतार’ ने पुन्हा उघडली. तर पूर्ण वर्षभराचे उत्पन्न कोकणातील चित्रपटगृहांनी एकट्या ‘दशावतार’ वर कमावले.
काही खेड्यांमध्ये कंटेनर थिएटर ‘ दशावतार ‘ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या दारात पोहोचले. या चित्रपटाने लोकांचा उदंड प्रतिसाद तर मिळवलाच पण मराठी चित्रपट, नाटक आणि सामाजिक वर्तुळात ‘दशावतार’ ची खूप प्रशंसा झाली. अशा रितीने मराठी चित्रपट उद्योगाला आलेली मरगळ झटकून मराठी चित्रपटाला नवचैतन्य देण्याचे काम दशावतार चित्रपटाने केले आहे . इतकेच नव्हेतर ज्या दशावतारी कलाप्रकाराचा आधार या चित्रपटात घेतला गेला, ती लोककला आणि दशावतारी कलाकार यांना पुन्हा एक तेजी मिळवून देण्यासाठी हा चित्रपट कारणीभूत ठरतो आहे. कोकण आणि गोवा इथवरच मर्यादित असलेल्या दशावतारी नाटकांना पुण्या मुंबईतून खेळांची मागणी येत आहे.
‘दशावतार ‘ चित्रपटाने फक्त बॉक्स ऑफिसवर माया कमावली नाही तर जनमानसात एक चळवळ उभी करण्याचं कामही केलं आहे. कोकणातील जमिनी, देवराया, निसर्ग वाचवण्यासाठी कोकणी माणूस पुढाकार घेताना आज दिसत आहे. कोकणातील कातळशिल्पांबाबत, त्याच्या संवर्धनासाठी तो सजग झाला आहे.
नुकताच ( २७ सप्टेंबर २०२५) जागतिक पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसीने निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्याशी कातळशिल्पं जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी सामंजस्य करार केला आहे. यामुळे कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचा विकास होणार आहे. मराठी सिनेउद्योग , दशावतारी कला, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाबाबत होत असलेले सकारात्मक बदल हेच ‘दशावतार‘ या चित्रपटाचे फार मोठे यश म्हणावे लागेल.
Web Summary : Marathi film 'Dashavatar' thrives, surpassing Bollywood and 'Kantara'. Earning over ₹25 crore globally, it boosts Marathi cinema, revives theaters, and supports the Dashavatari art form. It also inspires environmental conservation in Konkan.
Web Summary : मराठी फिल्म 'दशावतार' बॉलीवुड और 'कांतारा' से बेहतर प्रदर्शन कर रही है। इसने 25 करोड़ रुपये से अधिक की कमाई की है, मराठी सिनेमा को बढ़ावा दिया है, थिएटरों को पुनर्जीवित किया है, और दशावतारी कला का समर्थन किया है। यह कोंकण में पर्यावरण संरक्षण को भी प्रेरित करता है।