Dashavatar: कोकणातील परंपरेचं दर्शन घडवणारा आणि महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारा 'दशावतार' हा मराठी सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. कित्येक कालावधीनंतर अशी कलाकृती मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे 'दशावतार'चं सगळीकडूनच कौतुक होत आहे. 'दशावतार'मधील सिनेमॅटोग्राफी, कथा, कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन सगळ्याच गोष्टी चपखल बसल्या आहेत. यातून दिलीप प्रभावळकर यांच्यासारख्या दिग्गज नटाच्या अभिनयाच्या ताकदीचं दर्शनही घडत आहे.
'दशावतार'ला मिळालेलं प्रेम पाहून दिग्दर्शक सुबोध खानोलकर भारावून गेले आहेत. त्यांनी दिलीप प्रभावळकर यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 'दशावतार'च्या सेटवरील एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. "दशावतार आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आमच्या दिलीप काकांना साष्टांग दंडवत! त्यांनी विश्वास ठेवला म्हणून हा चित्रपट साकार होऊ शकला", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
'दशावतार' सिनेमात दिलीप प्रभावळकर बाबुली मेस्त्री या दशावतार साकारणाऱ्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत. या सिनेमात प्रियदर्शिनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, भरत जाधव, सुनील तावडे, अभिनय बेर्डे, आरती वाबगावकर, महेश मांजरेकर अशी स्टारकास्ट आहे. या सिनेमाने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर १६.६५ कोटींची कमाई केली आहे.