Join us
Daily Top 2Weekly Top 5

विनोदी नाटक 'यादोंकी वरात' रंगभूमीवर रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 10:17 IST

माणसाला नको असलेल्या,त्रासदायक,अस्वस्थ करणार्‍या आठवणी मेंदुतून पुसता आल्या तर ? पण हे शक्य आहे का ? वास्तवात नाही पण ...

माणसाला नको असलेल्या,त्रासदायक,अस्वस्थ करणार्‍या आठवणी मेंदुतून पुसता आल्या तर ? पण हे शक्य आहे का ? वास्तवात नाही पण नाटकात हे नक्की शक्य आहे.असाच विचार करायला लावणार्‍या भन्नाट विनोदी आशयावर बेतलेलं “यादोंकी वरात” हे नवीन नाटक नुकतंच रंगभूमीवर आले आहे.‘छडा’ हया यशस्वी नाटकानंतर अवनिश प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्माते महेश रामचंद्र ओवे यांनी हया नाटकाची निर्मिती केली आहे.हया नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन निखिल रत्नपारखी यांनी केले असून यात त्यांनी प्रमुख भूमिकाही साकारली आहे.“यादोंकी वरात” हे नाटक पती आणि पत्नी यांच्या कडू गोड गमतीदार प्रसंगावर आधारीत आहे. घनश्याम गायकैवारी नावाचा माणूस एक दिवस न्यूरॉलॉंजिस्ट डॉक्टर बेरंग्यांच्या क्लिनिकमध्ये येतो आणि त्यांचच व्हिजिटिंग कार्ड त्यांना दाखवतो. ज्यावर त्याच्या बायकोने ठराविक दिवशी, ठराविक वेळेला डॉ. बेरंग्यांना भेटण्याविषयी लिहिलेलं असतं.माझी बायको एक महिन्यापासून गायब झाली आहे आणि तिचं तुम्ही काय केलंत हे सांगणार नसाल तर मी पोलिस स्टेशनमध्ये जाईन अशी तो धमकी देतो. तेव्हा त्याच्या बायकोची माहिती देण्याआधी डॉक्टरांनी लावलेल्या एका यंत्राच्या संशोधनाबद्दल त्याला माहिती दिली जाते. ज्या यंत्रात माणसाला नको असलेल्या, त्रासदायक, अस्वस्थ करणार्‍या आठवणी मेंदुतून पुसून टाकता येतात अशी सोय आहे. त्याच्या बायकोनेही घनश्यामच्या आठवणी तिच्या मेंदुतून पुसून टाकल्याचं त्याला समजतं. हे ऐकून घनश्याम बेहद खुश होतो व तोही आपल्या आठवणी पुसून टाकायला तयार होतो. त्या आठवणी म्हणजेच नाटकातील विविध धमाल गमतीशीर प्रसंग. प्रेक्षकांना हसून हसून वेड लावत नाटक शेवटापर्यंत येतं.नाटकाचा शेवट हा हास्याचा परमोच्च बिंदू आहे जो प्रेक्षकांना आश्चर्यचकीत करून हसायला लावतो. कायम आठवणीत राहणारं, आठवून आठवून हसायला लावणारं असं हे नाटक “यादोंकी वरात”.अभिनेता, लेखक व दिग्दर्शक म्हणून निखिल रत्नपारखी सर्वांच्या परिचयाचे  आहेत.विविध विनोदी पार्श्वभूमी असलेल्या जाहीराती, मालिका व चित्रपटाद्वारे तो घराघरात पोहोचला आहे.एक उत्तम विनोदवीर म्हणून वलय निर्माण करण्यात तो यशस्वी झाला आहे.“यादोंकी वरात” हा आगळा वेगळा विषय प्रेक्षकांसमोर आणून लेखक,दिग्दर्शक व अभिनेता ह्या तिन्ही जबाबदार्‍या त्याने यशस्वीरीत्या सांभाळल्या आहेत. हया नाटकात तो प्रमुख भूमिकेत असून सोबत भक्ती रत्नपारखी, तुषार गावरे,तारका पेडणेकर व विनायक कदम यांच्या भुमिका आहेत.हया नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये,प्रकाश शितल तळपदे,संगीत गंधार संगोराम, वेशभूषा कमल खान आणि सुत्रधार मंगेश कांबळी आहेत.भिन्न विषय,दर्जेदार विनोद आणि तगडी स्टारकास्ट असलेलं हे नाटक प्रेक्षकांनी आवर्जून पाहावं असंच आहे.