चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव यांचा हलाल ६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 16:22 IST
मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा म्हणून संबोधला जाणारा तिहेरी तलाक हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. याच प्रथेचा परामर्ष घेणारा हलाल ...
चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव यांचा हलाल ६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीस
मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा म्हणून संबोधला जाणारा तिहेरी तलाक हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. याच प्रथेचा परामर्ष घेणारा हलाल ६ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. समांतर किंवा चाकोरीबाहेरील चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी हलाल चित्रपटातून मुस्लीम स्त्रियांच्या व्यथा, वेदना मांडत वास्तववादी सामाजिक प्रश्नाला स्पर्श केला आहे. ‘अमोल कागणे फिल्म्स प्रस्तुत’ हलाल या चित्रपटाची निर्मिती राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण कागणे आणि अमोल कागणे यांनी केली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, पुणे फिल्म फेस्टिव्हल, औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हल, गोवा फिल्म फेस्टिव्हल यांसारख्या अनेक राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटांनी आपली मोहोर उमटवली आहे.लेखक राजन खान यांच्या ‘हलाला’ कथेवर आधारित या सिनेमात सामाजिक बंधनांखाली स्त्रियांची केली जाणारी घुसमट मांडतानाच प्रेमकथेची सुंदर किनार दिग्दर्शकांनी या चित्रपटाला जोडली आहे. विवाह आणि तलाक या दोन महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मुस्लीम स्त्रियांचे मत विचारात घेतले जात नसल्याने याचा परिणाम त्यांच्या भावनांवर कशाप्रकारे होतो याचे परखड चित्रण हलालमध्ये करण्यात आले आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, छाया कदम, अमोल कागणे, विमल म्हात्रे, संजय सुगावकर या कलाकारांच्या यात मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद निशांत धापसे यांचे आहेत. छायांकन रमणी रंजनदास, संकलन निलेश गावंड यांचे आहे. कार्यकारी निर्माते मिथिलेश सिंग राजपूत आहेत. चित्रपटाची गीते सुबोध पवार आणि सय्यद अख्तर यांनी लिहिली असून संगीताची जबाबदरी विजय गटलेवार यांनी सांभाळली आहे. गायक आदर्श शिंदे, सय्यद अख्तर, विजय गटलेवार यांचा स्वरसाज या चित्रपटाला लाभला आहे. उच्च निर्मितीमूल्य, सशक्त आशय, कलाकारांची जमून आलेली भट्टी या सगळ्यांमुळे हलाल नक्कीच प्रेक्षकांची मने जिंकेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. सेन्सॉरच्या अडचणी कमी म्हणून की काय अनेक संघटनांच्या विरोधाचा सामनाही या चित्रपटाला करावा लागला होता. मानवी वेदनेची ही कथा सर्वांपुढे यावी या उद्देशाने चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी अडथळ्यांची ही शर्यत पार करत हलालच्या प्रदर्शनाचा निर्णय घेतला आणि आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. Also Read : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिवाजी लोटन पाटील यांचा ‘हलाल’