Join us

‘छंद प्रितीचा’मधून रुपेरी पडद्यावर पुन्हा रंगणार तमाशाचा फड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 14:29 IST

प्रत्येकाला जीवनात काही ना काही छंद असतो. कुणाली जुनी नाणी-नोटा जमा करण्याचा, कुणाचा पोस्टाची तिकीटं जमा करण्याचा, कुणाला शिंपल्या ...

प्रत्येकाला जीवनात काही ना काही छंद असतो. कुणाली जुनी नाणी-नोटा जमा करण्याचा, कुणाचा पोस्टाची तिकीटं जमा करण्याचा, कुणाला शिंपल्या गोळा करण्याचा आणि कुणाला आपल्या आवडत्या कलाकार आणि नेत्यांचे फोटो जमा करण्याचा छंद असतो. ‘हा छंद जीवाला लावी पिसे’ या मोहम्मद रफी यांच्या गाण्याच्या ओळीप्रमाणे प्रत्येकजण काही ना काही छंद जोपासत असतो. मात्र काहींना प्रेमाचा छंद लागतो. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणा-या प्रेमी युगुलांचा छंद काहीसा अनोखाच म्हणावा लागेल. हाच धागा पकडून प्रितीचा छंद लागलेल्या दोन जीवांची कथा सांगणारा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं नाव छंद प्रितीचा असं आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं. या पोस्टरची एक खास बात आहे. हे पोस्टर पाहून मराठीतील गाजलेल्या सिनेमाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. या सिनेमाचं पोस्टर पाहिलं की मराठीत गाजलेल्या 'पिंजरा' आणि 'सांगत्ये ऐका' या सिनेमांची आठवण येते. तमाशाप्रधान सिनेमांनी मराठी सिनेमाचा एक काळ गाजवला होता. तमाशा आणि सिनेमा हे जणू काही समीकरणच बनलं होतं. रसिकांनाही तमाशा, त्यातील सामना, लावण्या सारं काही चांगलंच भावायचं. मात्र काळ बदलला आणि मराठी सिनेमातून तमाशा निघून गेला. एखाद दुसरी लावणी, गाणं इतकंच काही ते तमाशाचं स्वरुप सिनेमात दिसू लागले. गेल्या काही दिवसांत तमाशावर आधारित गाणं सिनेमात दिसलं नव्हतं. मात्र आता छंद प्रितीचा या सिनेमातून पुन्हा एकदा मराठी रसिकांना तमाशा पाहायला मिळणार आहे. गावापासून शहरापर्यंत प्रत्येक व्यक्तीचं मनोरंजन करणा-या तमाशाचा आनंद रसिकांना या सिनेमाच्या माध्यमातून घेता येणार आहे. सुबोध भावे, सुवर्णा काळे यांच्याबरोबरच नवा चेहरा हर्ष कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय त्यांच्या जोडीला शरद पोंक्षे, विकास समुद्रे, सुहासिनी देशपांडे, गणेश यादव अशी कलाकारांची मंडळी पाहायला मिळणार आहेत. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन एन. रेळेकर यांनी केलं असून चंद्रकांत जाधव यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. छंद प्रितीचामध्ये सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी जितेंद्र आचरेकर यांनी उचलली आहे. संगीत दिग्दर्शन प्रविण कुंवर यांनी केलं आहे. प्रेमला पिक्चर्स निर्मित 'छंद प्रितीचा' हा सिनेमा येत्या 10 नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.