चेतन चिटणीस झळकणार हिंदी वेबसीरीजमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 17:33 IST
सध्या हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये वेबसीरीजची चलती आहे. यामध्ये मराठी वेबसीरीज जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या वेबसीरीजमध्ये ...
चेतन चिटणीस झळकणार हिंदी वेबसीरीजमध्ये
सध्या हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये वेबसीरीजची चलती आहे. यामध्ये मराठी वेबसीरीज जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या वेबसीरीजमध्ये प्रेक्षकांचे लाडके कलाकारदेखील मोठया प्रमाणात दिसत आहे. आता मराठी वेबसीरीजप्रमाणेच हिंदी वेबसीरीजमध्येदेखील मराठी कलाकार पाहायला मिळणार आहे. लवकरच एक हिंदी वेबसीरीज येत आहे. या हिंदी वेबसीरीजमध्ये प्रेक्षकांचा लाडका अभिनेता चेतन चिटणीस पाहायला मिळणार आहे. त्याच्या या हिंदी वेबसीरीजविषयी चेतन लोकमत सीएनएक्सला सांगतो, मला हिंदी वेबसरीजमध्ये काम करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी खरचं आनंदाची गोष्ट आहे. या वेबसीरीजमध्ये माझ्यासोबत आर माधवनदेखील झळकणार आहे. बॉलिवुडच्या या तगडया कलाकारासोबत काम करण्यास मिळणे म्हणजे करिअरला चार चाँद लागल्यासारखेच आहे. या वेबसीरीजच्या चित्रिकरणाची सुरूवात काही दिवसातच सुरूवात होणार आहे. त्यासाठी मीदेखील खूप उत्साहित झालो आहे. कारण चित्रपट, नाटकनंतर काहीतरी भन्नाट अनुभव मला मिळणार आहे. तसेच या वेबसीरीजच्या माध्यमातून मला मिळालेल्या या संधीचं नक्कीच मी सोनं करण्याचा प्रयत्न असणार आहे. चेतन यापूर्वी फोटोकॉपी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री पर्ण पेठेदेखील झळकली होती. आता तो एका आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. त्याचा हा आगामी चित्रपटदेखील लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तो एका रोमॅण्टिक भूमिकेत दिसणार आहे. तसेच त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री कृतिका गायकवाड असणार आहे. चला तर मग चित्रपटानंतर आता चेतनच्या आगामी वेबसीरीजची वाट पाहूयात.