केदार शिंदे (Kedar Shinde) मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांचं दिग्दर्शन केलं. अनेक मराठी नाटकही बसवले. तसंच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मराठी सिनेमांची तर आजही तितकीच क्रेझ आहे. केदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू आहेत. त्यांच्या मावशी चारुशीला साबळे या उत्तम नृत्यांगना आहेत. तसंच त्या अभिनयही करतात. केदार शिंदेंनी अनेक कलाकारांचं करिअर घडवलं. पण आपल्या मावशीलाच कधी त्यांच्या सिनेमात संधी दिली नाही अशी खंत चारुशीला साबळे (Charusheela Sable) यांनी व्यक्त केली आहे.
'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीत चारुशीला साबळे म्हणाल्या, "आमच्या घरातला केदार एवढा यशस्वी दिग्दर्शक झाला ही खू अभिमानाची गोष्ट आहे. तो माझा विद्यार्थीही आहे. जेव्हा मी लोकधारा केलं तेव्हा केदार १० वर्षांचा होता. मी जेव्हा मुलांना शिकवत होते, एक एक पाऊल टाकत होते हे सगळं केदारने बघितलं आहे. शाहीर साबाळेंचा नातू, माझ्या सख्ख्या बहिणीचा मुलगा केदार इतका लाडात वाढला आहे. त्या काळात त्याच्यासाठी जरदाळूची वेगळी पाकीटं आणून ठेवली जायची आणि आम्हाला हातही लावू दिला जायचा नाही असं त्याचं बालपण गेलं आहे. तो चांदीचा चमचा घेऊनच जन्माला आला आहे."
"आम्हालाही खूप अभिमान आहे की तो इतका मोठा दिग्दर्शक झाला. केदार हा उद्धार करणारा माणूस आहे. त्याने शुभांगी गोखले, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, प्रिया बेर्डे यांना काम दिलं आणि त्यांचा उद्धार केला. त्यांचं करिअर केदारमुळेच बनलं. लक्ष्या गेल्यानंतर जत्रा सिनेमात त्याच्या बायकोला प्रियाला काम दिलं आणि तिचा उद्धार केला. माझा नवरा गेल्यावर तो माझाही उद्धार करेल असं मला वाटलं. पण तसं काही घडलं नाही. आता त्यानेच सांगावं की त्याने मला काम का दिलं नाही. त्याने अनेक स्त्रीप्रधान सिनेमेही केले. मला एखादी भूमिका देऊच शकला असता. पण त्याने असं केलं नाही. याचं उत्तर तोच देऊ शकेल. आमचं कधी यावर बोलणंही झालं नाही. एकदा योग आला होता तो मला एक भूमिका देणार होता पण नंतर त्याने तीही दुसरीलाच दिली. मग मी त्याचदरम्यान महेश कोठारेला फोन केला आणि त्याच्याच मालिकेत काम मिळवलं. वर्षभर मी ती मालिका केली. मी अजूनही काम करु शकते हे मला दाखवून द्यायचं होतं."