अभिनेता सुनील बर्वेनी जुनी नाटके पुन्हा रंगभूमीवर आणण्यचा हर्बेरियमद्वारे केलेला प्रयोग रसिकांना खूप आवडला होता. सुनील हर्बेरियममार्फत भविष्यात काय घेऊन येतोय याची उत्सुकता रसिकांना लागलेली आहे. तसेच अमर फोटो स्टुडिओ या त्याच्या आगामी नाटकाचीही सध्या सोशल नेटवर्किंगला प्रचंड चर्चा आहे. या त्याच्या नाटकाविषयी सीएनएक्ससोबत सुनीलने मारलेल्या गप्पा...
अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी हे तिघे माझ्याकडे आले होते. दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका करत असताना आपण एखादे नाटक केले पाहिजे अशा त्यांच्या नेहमी गप्पा रंगत असत. मालिका संपल्यानंतर नाटक करावे असा त्यांचा विचार सुरू होता. नाटकाबाबत मी त्यांना मी काही मार्गदर्शन द्यावे असे त्यांचे म्हणणे असल्याने ते मला भेटायला आले होते. त्यावेळी कोणत्या विषयावर त्यांना नाटक बनवायचे वगैरे काहीच त्यांच्या डोक्यात नव्हते. आम्ही भेटलो तेव्हा भारतातील-परदेशातील अनेक नाटकांवर आमच्या गप्पा रंगल्या आणि रंगभूमीवर आतापर्यंत सादर केल्या गेलेल्या नाटकांपेक्षा वेगळे नाटक बनवूया यावर आमचे एकमत झाले. पण काहीतरी वेगळे म्हणजे काय करायचे हे आम्हाला सुचत नव्हते. आम्ही कित्येक दिवस यावर विचारच करत होतो. एकदा मला अमेय, सखी आणि सुव्रतचा फोन आला की, त्यांची निपुण धर्मांधिकारी याच्यासोबत काही चर्चा झाली आहे आणि मनस्विनीला काहीतरी वेगळे लिहायला सांगूया असे ठरले आहे आणि काहीच दिवसांत अमर फोटो स्टुडिओ या नाटकाची कथा तिने आम्हाला ऐकवली आणि पहिल्या वाचनातच हा विषय आम्हाला प्रचंड आवडला. सगळ्याच वयोगटातील लोकांना आपसाला वाटेल असा या नाटकाचा विषय आहे.
अमर फोटो स्टुडिओ या नाटकाचे सोशल मीडियामार्फत करण्यात आलेले प्रमोशन सगळ्यांनाच प्रचंड आवडले. या नाटकाच्या प्रमोशनसाठी तुम्ही जुन्या पासपोर्ट साईज फोटोचाच वापर करायचे का ठरवले?
लहानपणीचा फोटो पाहिल्यावर नकळतच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हसू उमलते. तसेच तुम्हाला कोणी फेसबुकला जुना फोटो टाकण्यासाठी आव्हान दिले तर तो फोटो शोधून अपलोड करण्यात एक वेगळीच मजा येते. यामुळेच अमर फोटो स्टुडिओच्या प्रमोशनची आमची कल्पना प्रचंड हिट झाली असे मला वाटते आणि विशेष म्हणजे आमच्या नाटकाचे नाव हे स्टुडिओशी संबंधित असल्याने आम्ही प्रमोशनसाठी फोटोंचा वापर करायचे ठरवले. पूर्वी ज्यावेळी लोकांकडे मोबाईल, चांगल्या दर्जाचे कॅमेरे नव्हते. तेव्हा स्टुडिओत जाऊन फोटो काढले जात असत. आमच्या या प्रमोशन फंड्यामुळे लोकांच्या त्या आठवणींनाही नक्कीच उजाळा मिळाला असेल.
हर्बेरियममध्ये लोकांना जुनी नाटके पुन्हा पाहायला मिळाली होती. रसिकांना हा प्रयोग प्रचंड आवडला होता. हर्बेरियमचा नवा सिझन रसिकांच्या कधी भेटीस येणार आहे?
हर्बेरियममार्फत पुन्हा काहीतरी करायचे असा विचार कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. 2012ला हर्बेनियममुळे अनेक जुनी नाटके प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळाली. पण हर्बेरियम संपल्यानंतर अनेक निर्मात्यांनी जुनी नाटके रंगभूमीवर आणली आहेत. त्यामुळे पुन्हा जुनी नाटके नव्या ढंगात करायची की काही वेगळे करायचे याचा सध्या विचार सुरू आहे. एखादे संगीत नाटक करूया असादेखील आमचा विचार सुरू होता. पण त्याचवेळी काही संगीत नाटके आणि चित्रपट आले. त्यामुळे संगीत नाटके न करण्याचे आम्ही ठरवले. सध्या तरी आमच्या चर्चा सुरू आहेत. पण हर्बेरियम लवकरच रसिकांच्या भेटीस आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.
नटसम्राट या चित्रपटानंतर आता तू कोणत्या चित्रपटात झळकणार आहेस?
पुढील काळात माझे तीन-चार चित्रपट येणार असून या सगळ्या चित्रपटांमधील माझ्या भूमिका खूपच वेगळ्या आहेत.