भाऊ कदमचे या कारणामुळे केले जातेय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 17:06 IST
फू बाई फू या कार्यक्रमामुळे भाऊ कदम हे नाव नावारूपाला आले. तसेच टाईपमास या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील चांगलेच ...
भाऊ कदमचे या कारणामुळे केले जातेय कौतुक
फू बाई फू या कार्यक्रमामुळे भाऊ कदम हे नाव नावारूपाला आले. तसेच टाईपमास या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक झाले होते. फेरारी की सवारी या हिंदी चित्रपटात देखील तो झळकला होता. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे तर तो लोकांच्या घराघरात पोहोचला. भाऊ कदम सध्या अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणात, नाटकात, चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात व्यग्र आहे. अभिनय हे त्याचे पहिले प्रेम असल्याने तो सगळ्या गोष्टी खूप चांगल्याप्रकारे सांभाळतो. भाऊ कदम हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचे नाव आहे. त्याच्या चित्रपटाने आजवर बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले आहेत आणि आता भाऊने स्वतः एक विक्रम रचला आहे. एक ऑक्टोबरला भाऊने एकाच दिवशी दोन नाटकांचे चार प्रयोग केले आहेत. हा एक विक्रम असून त्यासाठी सगळेच भाऊचे कौतुक करत आहेत. एका दिवसात चार प्रयोग करण्याची भाऊची ही पहिलीच नाही तर तिसरी वेळ आहे. विजय केंकरे दिग्दर्शित शांतेचे कार्ट चालू आहे या नाटकाचे तीन प्रयोग तर पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या नाटकाचा एक असे एकूण मिळून त्याने एकाच दिवसांत चार प्रयोग केले. विशेष म्हणजे शांतेचे कार्ट चालू आहे आणि व्यक्ती आणि वल्ली या दोन्ही नाटकांची निर्मिती अमेय खोपकर यांनीच केली आहे. शांतेचे कार्ट चालू आहे हे नाटक अनेक वर्षांपूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रंगमंचावर सादर केले होते. या नाटकाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या नाटकातील लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुधीर जोशी यांची केमिस्ट्री आजही लोकांच्या लक्षात आले. भाऊच्या शांतेचे कार्ट चालू आहे या नाटकाला देखील प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळत आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचे पुढील काही भागांसाठीचे चित्रीकरण नुकतेच दुबईत करण्यात आले. भाऊ देखील त्याच्या टीमसोबत दुबईलाच होता. पण त्यातूनही वेळ काढून त्याने एका दिवशी चार प्रयोग केले. Also Read : जाणून घ्या झी मराठी अवॉर्डसमध्ये तुमच्या कोणत्या आवडत्या कलाकारांना मिळाले नामांकन