Join us

​पालक आणि पाल्यामधील संवादाचे महत्त्व अधोरेखित करणारा ‘बारायण’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 17:27 IST

पालक आणि पाल्यांमधला संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे करियरच्या टप्प्यावर असणाऱ्या मुलांच्या मनातील इच्छा आणि पालकांच्या मनातील इच्छा ...

पालक आणि पाल्यांमधला संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे करियरच्या टप्प्यावर असणाऱ्या मुलांच्या मनातील इच्छा आणि पालकांच्या मनातील इच्छा यांचा ताळमेळ बसेनासा झाला असून त्यातून विविध सामाजिक समस्या निर्माण होत आहे. या साऱ्या समस्यांच्या मुळाशी हळूवारपणे जाण्याचा प्रवास म्हणजे ‘बारायण’ असून या साऱ्याकडे वेगळ्या नजरेने पाहून अंर्तमुख करावा लावणारा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा विश्वास चित्रपटाचे दिग्दर्शक दिपक पाटील आणि अभिनत्री प्रतिक्षा लोणकर यांनी व्यक्त केला. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त या चित्रपटाच्या टीमने नुकतीच नाशिक ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या गाभ्याची आणि निर्मिती प्रक्रियेची माहिती दिली. चित्रपटात वडिलांचीे भूमिका साकरणाऱ्या नंदू माधव यांनी सांगितले की, पेशाने शिक्षक असणाऱ्या पण बारावीत असणाऱ्या मुलाच्या बापाच्या वेगळ्याच इच्छा असणारा, त्याच्या भवितव्याविषयी बायकोपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करणाऱ्या व्यक्तीची भूमिका मी साकारतो आहे. मुलाचे बारावीचे वर्ष म्हणजे घरात, शेजारी, नातेवाईकांमध्ये, गल्लीत सगळीकडेच किती गांभीर्याची स्थिती निर्माण झाली आहे, अचानक सगळेच कसे काळजीवाहू झाले आहेत, या दरम्यान होणाऱ्या गमतीजमतीची कहाणी म्हणजे हा चित्रपट आहे. मी आजवर केलेल्या चित्रपटांपैकी हा सर्वात सुंदर आणि वरच्या पायरीवरचा चित्रपट असेल असा विश्वास वाटतो असेही नंदू माधव यांनी यावेळी सांगितले. चित्रपटात आईची भूमिका साकारणाऱ्या प्रतिक्षा लोणकर यांनी सांगितले की, बारावीची परीक्षा देणाऱ्या, कोणत्याही परिस्थितीत त्याने उत्तम गुण मिळवून मेडिकलला गेले पाहिजे, डॉक्टर झाले पाहिजे या इच्छेसाठी जीवाचे रान करणारी, झापड लावलेली आई मी यात रंगवली आहे. या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर मला ती खुप आवडली. प्रत्यक्षात शुटिंग सुरू झाल्यानंतर तर चित्रपट कमी वाक्यांमधुन आणि दृष्यांमधुन खुप मोठा संदेश देणारा, हसतखेळत प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा सिनेमा आहे याची मला खात्री पटली. सावंतवाडी, बारामती अशा छोट्या शहरांमध्ये या चित्रपटाचे शुटिंग झाले असून छोट्या शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील, समाजातील चित्र या सिनेमात रेखाटण्यात आले असल्याचे दिग्दर्शक पाटील यांनी सांगितले.या चित्रपटात पाच वेगवेगळ्या धाटणीची अर्थपूर्ण गाणी असून दैवता पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १२ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाबाबत आपण आशावादी असल्याचे सांगत समाजात कोणत्याही आर्थिक स्तरात वावरताना विनम्रता किती आवश्यक आहे हा संदेश अप्रत्यक्षपणे देणारा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल असेही दैवता पाटील यांनी सांगितले. या चित्रपटात अनुराग वरळीकर, संजय मोने, वंदना गुप्ते, ओम भुतकर, कुशल बद्रिके, उदय सबनीस, समीर चौगुले, प्रभाकर मोरे, प्रसाद पंडित, निपुण धर्माधिकारी, श्रीकांत यादव, रोहन गुजर, प्रार्थना बेहेरे यांच्याही भूमिका आहेत. संपूर्ण कुटुंबासह बघता येणारा आणि सहज सोप्या पद्धतीने अंतर्मुख करणारा हा चित्रपट असल्याचे यावेळी कलाकरांनी सांगितले.