गायक सोनू निगम (Sonu Nigam) त्याच्या एका वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आहे. बंगळुरुत आयोजित कॉन्सर्टमध्ये त्याने पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केलं. कॉन्सर्टदरम्यान एका चाहत्याने सोनू निगमला कन्नड गाणं गाण्याची विनंती केली होती. परंतु ही मागणी सोनू निगमने वेगळ्या भावनेत घेतली आणि त्याची स्पष्ट प्रतिक्रिया दिली.'या चाहत्याच्या जन्माआधीपासून मी कन्नड गाणी गातोय. अशाच लोकांच्या मानसिकतेमुळे पहलगाम हल्ला होतो' असं तो म्हणाला. यावरुनच त्याच्यावर बरीच टीका झाली. सोनू निगमने माफी मागावी असाही सूर उमटला. आता या प्रकरणावर गायक अवधूत गुप्तेने (Avadhoot Gupte) पोस्ट करत सोनू निगमची बाजू घेतली आहे.
गायक सोनू निगमसाठी अवधूत गुप्तेने लांबलचक कविताच लिहिली आहे. तो लिहितो, "वा कानड्यांनो ! काय करता राव?तुम्ही बापाला ‘सॉरी‘ म्हणायला लावता राव?पहिलंच मान्य करतो. बाप असेल चुकला.इमोशनल होऊन जरा जास्तच बोलला.
पण मस्ती तुम्ही पोरांनीच केली होती ना?तो रंगात येत असता उगा कळं काढली होती ना?मग दिल्या ठेवून दोन त्यानं .. काय बिघडलं?तुम्ही थेट पोलिसात जाऊन सांगणार की ‘काय काय घडलं?‘
बाप चिडला की कधीतरी बोलतो काही बाही..पण मग त्यांनं पहलगाम काढायचं की गुरुग्रामहे ‘तुम्ही‘ सांगायचं नाही!!
अरे भिमाण्णां पासून शुभा मुदगलां पर्यंत सगळे तुमच्या भूमीतून आले..त्यांना कुणी भाषेवरुन कधी कुठे अडवले?भैरप्पांची लेखणी - सरस्वतीचं दुसरं नाव ..का उगा त्याची अशी लाज काढता राव?
अरे गायक सम्राट असतो त्याच्या मैफिलीचा..त्याला फरक पडत नसतो भाषा-शैलीचा!त्याला तेव्हा जे हवं ते त्याला गाऊ द्यावं..जमेल तेवढं ओंजळीत घ्यावं.. बाकी जाऊ द्यावं!
कलाकार म्हणजे इंद्राच्या दरबारातील शापित गंधर्व..त्याला तू विकत घेऊ शकत नाहीस!जात धर्म भाषांच्या तुझ्या कक्षांत..कुठलाच कलाकार कधीच बसत नाही!लक्षात ठेव..
अस्वल नाही तोजरी पैसे देऊन आणलास..आणि त्याच्या मर्जीने तो अस्वल झालाम्हणजे तू मदारी नाही झालास!बापाचं नाव सोनू आहे तरीतो बाई नाही..सोन्याचा गळा आहे..हाती कथलाचा वाळा नाही!
भाषेचा अभिमान मलाही आहे..म्हणून मातृभाषेतच सांगतोय.भाषांतर तू करून घे..पटला विचार तर बरंय,नाहीतर (डोसक्यात) घालून घे!
बाकी .. मी बापाला सांगणार आहे..
खूप त्रास झाला तर महाराष्ट्रात ये..पुढचा कार्यक्रम बंगळुरात कशाला?आपल्या बेळगांवात घे!!