'लग्नाळू' गाणे लिहिण्यासाठी अवधुत गुप्तेला या गोष्टीमुळे मिळाली प्रेरणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 14:28 IST
'लग्नाळू' गाणे लिहिण्यासाठी अवधुत गुप्तेला गदिमांच्या 'घननिळा लडीवाळा' या गोष्टीमुळे प्रेरणा मिळाली.
'लग्नाळू' गाणे लिहिण्यासाठी अवधुत गुप्तेला या गोष्टीमुळे मिळाली प्रेरणा
मराठीला संस्कृत भाषेतून देणगी लाभलेल्या अक्षरमालिकांमधील 'ळ' ची मज्जा काही औरच आहे. केवळ मराठीतच वापरल्या जाणाऱ्या या 'ळ' उच्चारांवर आधारित गदिमांचे 'घननिळा लडीवाळा' हे गाणे आपल्या सर्वांच्या चांगल्याच परिचयाचे आहे. ज्याच्या ध्रुवपदातच 'ळ' चा तब्बल १२ वेळा उपयोग करण्यात आला होता. मात्र त्यांच्या या गाण्याचा विक्रम आता मोडीत निघाला आहे. सर्वाधिक 'ळ' चा विक्रम आता आगामी बॉईज या सिनेमातील 'लग्नाळू' गाण्याच्या नावे जमा झाला आहे. संगीतकार अवधूत गुप्ते लिखित 'लग्नाळू' गाण्यात तब्बल १४ वेळा 'ळ' चा वापर करण्यात आला आहे. याबद्दल बोलताना अवधूत गुप्ते यांनी सांगितले की, 'ग.दि.माडगुळकर यांच्या सुप्रसिद्ध गाण्यामुळे मला हे गाणे लिहायला प्रेरणा मिळाली. आपणही या गाण्यासारखे 'ळ' चा सर्वाधिक उच्चार असलेले गाणे लिहावे असे वाटून गेले आणि मी 'लग्नाळू' हे गाणे कागदावर उतरवले. हे गाणे मी यापूर्वीच लिहून काढले होते, केवळ सादरीकरणासाठी चांगल्या संधीची वाट पाहत होतो आणि 'बॉईज' सिनेमात त्याचा उपयोग झाला. माझ्यातल्या 'ळ' प्रेमाला या गाण्याद्वारे मी वाट करून दिली आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे निर्मित 'बॉईज' हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबरला प्रदर्शित होत असून या सिनेमात चक्क सनी लिओनी थिरकताना दिसणार आहे. विशाल देवरुखकर दिग्दर्शित या सिनेमाद्वारे अवधूत प्रथमच प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. कम्प्लिट यूथ एन्टरटेनिंग असणाऱ्या या सिनेमात पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड यांची मुख्य भूमिका आहे. Also Read : 'बॉईज' मध्ये दिसणार सनी लिओनीचा मराठमोळा अंदाज