Join us

संगीतमय राजा चित्रपटगृहात चित्रपटाला प्रेक्षक पसंतीची पावती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 17:00 IST

मराठी चित्रपटात अलीकडे सातत्याने वेगवेगळे विषय नाविन्यपूर्ण मांडणीतून आपणास पाहायला मिळत आहेत. स्वप्नपूर्तीचा प्रवास सोपा कधीच नसतो. क्षणोक्षणी निर्णय ...

मराठी चित्रपटात अलीकडे सातत्याने वेगवेगळे विषय नाविन्यपूर्ण मांडणीतून आपणास पाहायला मिळत आहेत. स्वप्नपूर्तीचा प्रवास सोपा कधीच नसतो. क्षणोक्षणी निर्णय घेत, मेहनत करत, भावनांची निरगाठ सोडवत स्वप्नं कशी प्रत्यक्षात आणायची हे सांगू पहाणारा ‘राजा’ हा संगीतमय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सत्यसाई मल्टीमिडीया प्रा.लि’ चे निर्माते प्रवीण काकड  यांनी या चित्रपटाची निर्मीती केली असून दिग्दर्शन शशिकांत देशपांडे यांचे आहे. २५ मे ला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद सर्वत्र मिळत आहे. या चित्रपटाचा भव्य प्रीमियर नुकताच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून मान्यवरांकडून या चित्रपटाला कौतुकाची दाद मिळाली आहे.राजा या ध्येयवेडया मुलाच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. एका खेडेगावातील गरीब शेतकऱ्याचा मुलाचा संगीत शिखरावर पोहोचण्याचा भारावून टाकणारा प्रवास या सिनेमामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून ‘राजा’ची कथा सादर केली आहे. पॉपसिंगर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या राजाला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या संघर्षात त्याला कोणाची साथ मिळते ?राजाच्या आयुष्यात कोणकोणते ट्विस्ट येणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थिएटरकडे वळावे लागणार आहे. हा एक प्रेरणादायी प्रवास आहे.या चित्रपटाचे संगीत विविध संगीत शैलींचा  अनोखा अनुभव  देणारा असणार आहे. वलय मुळगुंद, मिलिंद इनामदार, केदार नायगावकर  यांच्या लेखणीने सजलेल्या गीतांना पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे. गावचा राजा, झन्नाटा, हंडीतला मेवा, जो बाळा जो जो रे, याद तुम्हारी आये, दगडाचे मन, हे मस्तीचे गाणे, आज सुरांना गहिवरले अशा वेगवेगळ्या जॉनरच्या आठ सुमधुर गाण्यांचा नजराणा यात आहे. सुखविंदर सिंग,शान, उदित नारायण या हिंदीतील दिग्गज गायकांसोबत रोहित राऊत, सौरभ साळुंखे, उर्मिला धनगर, सायली पडघन, मिलिंद शिंदे यांनी यातील गाणी गायली आहेत.चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी लिहिली असून संवाद मिलिंद इनामदार व शशिकांत देशपांडे यांनी लिहिले आहेत. सौरदीप कुमार, स्वरदा जोशी, निशिता पुरंदरे या नव्या चेहऱ्यांसोबत शरद पोंक्षे,जयवंत वाडकर, राजेश भोसले, सुरेखा कुडची, विनीत बोंडे, पौरस देशपांडे आदी कलाकारांसोबत अनुपम खेर, सुखविंदर सिंग, जस्लिनन मथारु हे पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे छायांकन दामोदर नायडू याचं आहे. निर्मिती व्यवस्थापक पूनम घोरपडे तर कार्यकारी निर्माता सत्यवान गावडे आहेत. वेशभूषा पूर्णिमा ओक यांची असून रंगभूषा शरद सावंत यांनी केली आहे.