अशोक सराफ यांची ‘प्रियतमा सीमा’ जगतेय हलाखीचं जीणं, मायबाप सरकारकडूनही उपेक्षेमुळे झिजवतेय मंत्रालयाचे उंबरठे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 11:42 IST
स्वप्नांची दुनिया,मायानगरी,चंदेरी दुनिया अशा किती तरी नावाने चित्रपटसृष्टीला ओळखलं जातं.या झगमगत्या दुनियेत करियर करण्याचं स्वप्न घेऊन अनेकजण येतात.त्यापैकी सगळ्यांनाच ...
अशोक सराफ यांची ‘प्रियतमा सीमा’ जगतेय हलाखीचं जीणं, मायबाप सरकारकडूनही उपेक्षेमुळे झिजवतेय मंत्रालयाचे उंबरठे !
स्वप्नांची दुनिया,मायानगरी,चंदेरी दुनिया अशा किती तरी नावाने चित्रपटसृष्टीला ओळखलं जातं.या झगमगत्या दुनियेत करियर करण्याचं स्वप्न घेऊन अनेकजण येतात.त्यापैकी सगळ्यांनाच इथं झटपट यश मिळतं असंही नाही.कारण कोणतंही क्षेत्र असो त्यात स्ट्रगल कुणालाही चुकला नाही. मात्र अशा आव्हानात्मक परिस्थितीतही मेहनतीच्या जोरावर अनेक कलाकार सुपरस्टारपदावर पोहचले आहेत.रसिकांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. करिअरच्या ऐन भरात असताना या कलाकारांना रसिकांचं प्रेम, अमाप लोकप्रियता आणि बक्कळ पैसाही मिळतो. मात्र याच चित्रपटसृष्टीची जशी चांगली बाजू तशी दुसरी बाजूही आहे. कारण इथं उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे. करिअर ऐन भरात असताना सेलिब्रिटींचं कौतुक होतं,प्रेम मिळतं. मात्र कालांतराने याच कलाकारांच्या उतारवयात किंवा पडत्या काळात कुणीच त्यांच्याकडे लक्षही देत नाही. अशी कित्येक उदाहरणं चित्रपटसृष्टीत आहेत ज्यांच्याकडे आपल्याच माणसांनी आणि सरकारनंही दुर्लक्ष केलं. यांत आणखी एका नावाची भर पडली आहे. प्रसिद्ध अभिनेता अशोक सराफ यांचा ‘वख्खा विख्खी वुख्खू’ हा डॉयलॉग तुम्हाला लक्षात असेलच. धुमधडाका या मराठी सिनेमातील हा गाजलेला डायलॉग. या सिनेमात अशोक सराफ प्रियतमा प्रियतमा म्हणत डान्स करत सीमाच्या मागे मागे असतात हेही आपण एन्जॉय केलं आहे. मात्र अशोक सराफ यांची हीच ऑनस्क्रीन ‘प्रियतमा सीमा’ सध्या रिअल लाइफमध्ये हलाखीचं जीणं जगत आहे. रुपेरी पडद्यावर सीमा साकारणा-या या अभिनेत्रीचं खरं नाव सुरेखा उर्फ ऐश्वर्या राणे असं आहे. धुमधडाकासह लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह 'भटकभवानी' या सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली आहे. याशिवाय 'शराबी','नमक हलाल' अशा हिंदी सिनेमातही त्यांनी काम केलं आहे. अमिताभ बच्चन, निळू फुले, परवीन बाबी, जयश्री गडकर यांच्यासारख्या कलाकारांसह त्यांनी स्क्रीन शेअर केला आहे. मात्र बिग बींच्या मर्द या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्या घोड्यावरुन पडल्या. या अपघातात त्यांच्या पाठीचे हाड मोडले अन् भरात असलेल्या करिअरला अनपेक्षित ब्रेक लागला. या दुखण्याच्या उपचारापायी सुरेखा यांना आपलं मुंबईचं घरही विकावं लागलं. काम सुटलं, नातेवाईक अन् इंडस्ट्रीनेही पाठ फिरवली. नियतीने त्यांच्यावर हलाखीचं जीणं जगण्याची वेळ आणलीय. चित्रपटसृष्टीत इतकं योगदान देऊनही तुटपुंजं पेन्शन मिळवून चरितार्थ चालवण्यासाठी सुरेखा राणे यांना मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. अशा या हलाखीच्या परिस्थितीत कुणीही जवळचं नसल्याने सावंतवाडीत त्या एकट्याच राहतात. राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने C ग्रेड कलाकारांना मिळणारी पेन्शन त्यांना मिळते. काही दिवसापुर्वी त्या हयात आहेत का ? याची माहिती घेण्यासाठी त्यांना मंत्रालयातून फोन करण्यात आला होता. पेन्शन बंद होईल या भितीने आपण अजून हयात आहोत हे सांगण्यासाठी त्या मंत्रालयातही त्या आल्या होत्या.A ग्रेडची रु.२१०० पेन्शन मिळावी अशी त्यांची मागणी आहे. मात्र त्यांना C ग्रेड कलाकारांना देण्यात येणारी रु.१५०० इतकी पेन्शन देण्यात येते. A ग्रेडच्या पेन्शनसाठी सुरेखा राणे यांनी वारंवार मंत्रालयात हेलपाटे मारले मात्र त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यांना निराधार योजनेचे रु.६०० हे मिळतात. मात्र यातून उदनिर्वाह करणं त्यांना कठीण जात आहे.अभिजीत झांबरे यांची काही दिवसांपूर्वी सुरेखा राणे यांच्याशी भेट झाली होती. या भेटीबाबतची पोस्ट अभिजीत यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. आता या एकेकाळच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला चित्रपटसृष्टी, दिग्गज कलाकार आणि समाजाने पुढे येऊन मदतीचा हात देणे गरजेचे आहे. तसंच कलाकारांवर अशी वेळ येऊच नये यासाठी चित्रपटसृष्टीने पुढाकार घेऊन काही ना काही ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. तसंच मायबाप सरकार, विशेषतः सांस्कृतिक मंत्र्यांनी याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.