Join us  

Ashok Saraf Birthday Special : अशोक सराफ यांनी बालवयातच सुरुवात केली होती अभिनयप्रवासाला, जाणून घ्या त्यांचा हा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 6:00 AM

अशोक सराफ यांनी खूपच लहान वयात एकांकिकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. ते केवळ सात वर्षांचे असताना त्यांना एका एकांकिकेतील अभिनयासाठी पुरस्कार मिळाला होता.

ठळक मुद्देकाहीच वर्षांत मी रंगभूमीवर चांगलाच रमलो. नाटकांमध्ये काम करत असतानाच दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटाद्वारे मी माझ्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर मलाच माझा अभिनय आवडला नाही. 

अशोक सराफ यांचा आज म्हणजेच ४ जूनला वाढदिवस असून त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. 

अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयप्रवासाविषयी लोकमतशी काही महिन्यांपूर्वी गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, माझे मामा गोपीनाथ सावकार यांची नाटक कंपनी होती. त्यामुळे सिनेमाचं नसलं तरी नाटकाचे वातावरण घरी होते. मी खूपच लहान असल्यापासून एकांकिकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. केवळ सात वर्षांचा असताना मला एका एकांकिकेतील अभिनयासाठी पुरस्कार मिळाला होता. तो पुरस्कार माझ्या आयुष्यातील पहिला पुरस्कार होता. त्यानंतर दहाव्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत बक्षीस मिळाले. यामुळे मी नकळतपणे रंगभूमीकडे वळलो. 

त्यावेळी आजसारखे नाटकांना सुगीचे दिवस नव्हते. अनेक नाटक कंपन्या डबगाईला आल्या होत्या. पण अभिनयाचे वेड असल्याने मी या क्षेत्राकडे वळलो. खरे तर अभिनयक्षेत्रात कारकिर्द करण्यास घरातून विरोध होता. पण तू हे करू नकोस असे थेट कोण सांगत नव्हते. काहीच वर्षांत मी रंगभूमीवर चांगलाच रमलो. नाटकांमध्ये काम करत असतानाच दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटाद्वारे मी माझ्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर मलाच माझा अभिनय आवडला नाही. 

रंगभूमीवर अभिनय करताना आम्ही काहीसा लाऊड अभिनय करतो. तसाच मी या चित्रपटात देखील केला होता. अशाप्रकारे अभिनय करणे हे चुकीचे असल्याचे मला माझे जाणवले आणि त्यानंतर मी चार वर्षं कोणत्याही चित्रपटात काम केले नाही. मी केवळ माझ्यात सुधारणा करण्याकडे लक्ष दिले. पांडू हवालदार या चित्रपटाच्या चित्रीकरणापर्यंत मी माझ्या अभिनयावर प्रचंड मेहनत घेतली होती. या चित्रपटातील माझा अभिनय प्रेक्षकांना इतका आवडला की, मी या चित्रपटानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण या चित्रपटानंतर 1995 पर्यंत मी चित्रीकरणात इतका व्यग्र होतो की, मी एकही दिवस चित्रीकरणातून सुट्टी घेतली नव्हती. या काळात माझ्या अभिनयाचे इतके कौतुक होत होते की, मला सतत काम मिळतच राहिली आणि मला मिळालेल्या प्रत्येक संधीचे मी सोने केले.

टॅग्स :अशोक सराफ