राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याचं दिसत आहे. यंदाची निवडणूक खऱ्या अर्थाने महत्त्वाची असणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पक्षातील उमेदवारासाठी राजकीय नेत्यांकडून प्रचार सभांच्या तोफा सर्वत्र धडाडल्या. या प्रचार सभांमधून अनेक आश्वासनं मतदारांना दिली गेली. सर्व पक्षांकडून जाहीरनामाही प्रसिद्ध केला गेला. यावरूनच आता मराठी लेखकाने मार्मिक पोस्ट शेअर केली आहे.
अरविंद जगताप हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय लेखक आहेत. समाजातील अनेक घडामोडींवर ते अगदी परखडपणे त्यांच्या लेखनातून भाष्य करीत असतात. आतादेखील निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. राजकीय नेत्यांच्या भाषणावरून अरविंद जगताप यांनी या पोस्टमधून नेत्यांना सणसणीत टोला लगावला आहे. "खूप उमेदवारांची भाषणं ऐकून आठवलेली म्हण...बोलण्यात गोड राघू, कामाला आग लागू", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
दरम्यान, राज्यात येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबरपर्यंत राजकीय पक्षांना सत्ता स्थापनेसाठी वेळ देण्यात आला आहे. सध्या राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमदेवारांपैकी कोण बाजी मारुन सत्ता स्थापन करेल, याबाबत चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. यंदा राज ठाकरेंचा मनसे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा हा संग्राम अटीतटीचा होणार आहे.