Join us  

मराठीत झळकणार आणखीन एक नवा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 12:36 PM

प्रतिक देशमुखचे 'शुभ लग्न सावधान'मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

ठळक मुद्देलग्नसंस्थेवर भाष्य करणारा चित्रपट 'शुभ लग्न सावधान'दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळाल्यामुळे प्रतिक स्वतःला समजतो नशीबवान

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. आता आणखीन एक नवा चेहरा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या कलाकाराचे नाव प्रतिक देशमुख असून तो 'शुभ लग्न सावधान' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात प्रतिकने रोहन कुलकर्णी नामक तरूणाची भूमिका केली आहे.

प्रतिक देशमुख मुळचा पुण्याचा असून त्याने वयाच्या तेराव्या वर्षांपासून अभिनय कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला आहे. तसेच त्याने वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत मराठी बालनाट्य, प्रायोगिक व व्यावसायिक नाटकात काम काम केले आहे. अमेरिकेतील परड्यू युनिव्हर्सिटीमधून इंजिनिअरिंग व मॅनेजमेंटमध्ये त्याचे शिक्षण झाले असून तिथे असताना प्रतिकने थिएटरमध्ये काम केले आहे व अमेरिकेत चॅरिटीसाठी शोज बसवले आहेत. त्यानंतर वॉशिंग्टन डीसीची नोकरी सोडून तो भारतात आला आणि अनुपम खेर यांच्या अभिनय शाळेत त्याने प्रशिक्षण घेतले. तसेच हिंदी चित्रपट व वेब सीरिजसाठी चांगल्या दिग्दर्शक, प्रोडक्शन हाऊससोबत वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही प्रतिकने काम केले.  'शुभ लग्न सावधान' चित्रपटात मिळालेल्या संधीबद्दल प्रतिक म्हणाला की,' आतापर्यंत मी एकोणीस जाहिरातींत काम केले आहे. हे सगळे करत असताना माझे हिंदीत काम सुरू होते. तिथल्या लोकांच्या आणि ‘शुभ लग्न सावधान’च्या निर्मात्यांची भेट झाली. त्यांनी मला दिग्दर्शक समीर सुर्वे यांना भेटवले. त्यानंतर माझे पाच मिनिटांच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेतले. त्यांना माझे ऑडिशन इतके आवडले की त्यांनी चित्रपटात सेकंड लीडची भूमिका दिली.' 'शुभ लग्न सावधान' हा चित्रपट लग्नसंस्थेवर भाष्य करतो. या चित्रपटाचा अनुभव अप्रतिम असल्याचे प्रतिक सांगतो आणि दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळाल्यामुळे स्वतःला तो नशीबवान समजतो.'शुभ लग्न सावधान' चित्रपटात प्रतिक व्यतिरिक्त सुबोध भावे, श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये, किशोर प्रधान व  रेवती लिमये हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 12 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :सुबोध भावे श्रुती मराठे