Join us

​'बॉईज' सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 12:24 IST

विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज' या अल्पावधीतच सुपरहिट ठरलेल्या सिनेमाचा 'नॉइज' संपूर्ण महाराष्ट्रात दुमदुमत आहे. सुप्रिम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे ...

विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज' या अल्पावधीतच सुपरहिट ठरलेल्या सिनेमाचा 'नॉइज' संपूर्ण महाराष्ट्रात दुमदुमत आहे. सुप्रिम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे निर्मित या सिनेमाला तरुणवर्गाने अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले आहे. किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या सिनेमाला दिलेल्या उदंड प्रतिसानंतर 'बॉईज' च्या टीमने खास आपल्या प्रेक्षकांसाठी 'लंपटझंपट'ची म्युझिकल ट्रीट देऊ केली आहे. शिवाय याच पार्टीत २०१९ला बॉईज सिनेमाचा सिक्वेल घेऊन येणार असल्याची अधिकृत घोषणा देखील निर्मात्यांनी केली. या सिनेमाच्या सक्सेस पार्टीमध्ये सिनेमातील सर्व कलाकारांना आकर्षक सन्मानचिन्ह देण्यात आले. खट्याळ 'बॉईज' वर्गाची धम्माल आणि मस्तीत रंगलेला हा सिनेमा प्रसिद्धीचा उच्चांक गाठत असल्यामुळे खास प्रेक्षकांसाठी सादर केलेले 'लंपटझंपट' हे गाणं सिनेमा रिलीज झाल्यानंतर चित्रित करण्यात आले असून सिनेमातील इतर गाण्यांप्रमाणे या गाण्यालादेखील प्रेक्षक पसंत करत आहे. 'लंपटझंपट' या उडत्या लयीच्या गाण्याला दिग्विजय जोशी यांचा आवाज लाभला असून मंगेश कांगणे लिखित हे गाणे अवधूत गुप्ते यांच्या संगीतदिग्दर्शकीय नजरेतून साकार झाले आहे. मराठीची बोल्ड आणि ग्लॅमरर्स अभिनेत्री स्मिता गोंडकरचा नखरेल अंदाज यात पाहायला मिळतोय. या सिनेमाविषयी सांगताना प्रस्तुतकर्ते अवधूत गुप्ते सांगतात, ''बॉईज' सिनेमाला सिनेरसिकांचे अमाप प्रेम मिळत असून, आमच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच प्रेक्षकांना 'लंपटझंपट' या गाण्याद्वारे आम्ही रिटर्न गिफ्ट देत आहोत. आमचे हे गिफ्ट प्रेक्षकांना आवडेल अशी मी आशा व्यक्त करतो.'संजय जाधव, अंकुश चौधरी, अमितराज, संचित पाटील, आनंद इंगळे तसेच वैशाली सामंत, रीना अगरवाल या सिनेतारकांची मांदियाळीदेखील या पार्टीतील आकर्षणाचा विषय ठरला. या सिनेमाने आजपर्यंत ८ करोड ४० हजारचा गल्ला जमवला आहे. तीन मित्राची न्यारी दुनिया आणि त्यांच्या विनोदाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटात संतोष जुवेकर, झाकीर हुसेन, वैभव मांगले, शिल्पा तुळसकर, शर्वरी जेमिनेस, रितिका शोत्री यांच्यादेखील भूमिका आहेत. पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी सिनेमाच्या यादीत अग्रस्थानावर लवकरच कूच करणार आहे.  Also Read : बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिल्या 'बॉईज'ला शुभेच्छा!