२००९ साली ‘गैर’ या चित्रपटात अंकुश चौधरी आणि सतीश राजवाडे यांनी एकत्रित काम केले. आता ही जोडी ‘ऑटोग्राफ’ या आगामी मराठी चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.
२०१५ मध्ये डबल सीट, दगडी चाळ आणि क्लासमेट्स हे तीन ब्लॉकबस्टर चित्रपट अंकुशने दिले आहेत. आता ‘ऑटोग्राफ’मध्ये अंकुश मध्यवर्ती भूमिकेत आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई पुणे मुंबई २’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.
‘ऑटोग्राफ’ची निर्मिती एसटीव्ही नेटवर्क्स यांनी केली आहे. आता ‘ऑटोग्राफ’ च्या दिग्दर्शनाने सतीश राजवाडे परत एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. १२ ऑगस्ट रोजी ‘ऑटोग्राफ’ संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित होणार आहे.
“अंकुशबरोबर पुन्हा एकदा काम करताना खूपच मजा आली. तो नेहमीच एक सुपरस्टार आणि एक चांगला कलाकार राहिला आहे. चित्रपटाच्या संकल्पनेने मला प्रेरित केले आणि तो करायचा मी ठरवले. तो एक संपूर्णतः व्यावसायिक चित्रपट आहे. ही एक अशी प्रेमकथा आहे की जी प्रत्येकालाच आवडेल. मला प्रेमकथेवर बेतलेले चित्रपट करायला आवडतात कारण ते निरंतन असतात. एसटीव्हीचे संस्थापक श्री इंदरराज कपूर यांचा मी खूप खूप आभारी आहे कारण त्यांनी माझ्यावर एक निर्माता म्हणून या चित्रपटासाठी आणि निर्मितीदरम्यान खूप विश्वास टाकला”, असे दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले.
एसटीव्हीचे संस्थापक आणि या चित्रपटाचे निर्माते श्री इंदरराज कपूर म्हणाले की, “या चित्रपटाचा विषय मला खूप भावला आणि त्याने मी प्रभावित झालो. ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ या माझ्या यापूर्वीच्या चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर मी चांगल्या कथेच्या शोधात होतो आणि ‘ऑटोग्राफ’च्या माध्यमातून मला ती मिळाली.”