Join us
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या 'पिकासो'वर राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची मोहोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 16:02 IST

‘पिकासो’ या 'दशावतारा' या कलाप्रकारावर आधारित असलेल्या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक, बाल कलाकार समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकादम यांच्या मुख्य भूमिका आहेत.

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने नुकताच आपल्या पहिल्या मराठी ‘पिकासो’ या चित्रपटाचा जागतिक प्रीमिअर जाहीर केला आणि सर्वच क्षेत्रांतून त्याच्यावर खूप प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव झाला. बाप आणि मुलाच्या हळूवार नात्याला तळकोकणातील दशावतार या पारंपारिक कलाप्रकाराच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेल्या या चित्रपटाने स्थानिक आणि जागतिक पातळीवर अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१९ मध्ये 'पिकासो' ला अन्य 2 चित्रपटांसह चित्रपटांच्या विशेष उल्लेखनीय श्रेणीत गौरवण्यात आले.

दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांनी सांगितले की, "महत्वाकांक्षा आणि संपूर्ण आवेशाने जे सादर केले त्याचा विशेष उल्लेख देशातील सर्वात सन्माननीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये झाला आहे, हे ऐकून खरोखर आनंद होतो आहे. मला असे वाटते की, मी एकप्रकारे दशावतार या कलाप्रकाराला न्याय दिला आहे आणि प्रेक्षकांना ती गोष्ट दाखवली आहे जी सांगण्याची आवश्यकता होती. मी 'पिकासो' पाहिलेल्या आणि आवडलेल्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो. तसेच एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि 240 हून अधिक देशांमध्ये चित्रपट पोहोचवल्याबद्दल अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओचे आभार मानतो."

याविषयी निर्माते, शिलादित्य बोरा म्हणाले की, "हा एक अभिमानाचा क्षण आहे आणि 'पिकासो'ला इतके प्रेम, कौतुक आणि ओळख मिळत आहे, हे पाहून मला आनंद होतो आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील ‘विशेष उल्लेखनीय श्रेणीमध्ये गौरव होणे, हे आम्ही जे काम करत आहोत ते करतच राहण्यासाठीचे सर्वात मोठे प्रोत्साहन आहे. ज्यांनी 'पिकासो'ला इतके भरभरून प्रेम दिले, त्या प्रत्येकाचे मी आभार मानतो."

‘पिकासो’ या 'दशावतारा' या कलाप्रकारावर आधारित असलेल्या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक, बाल कलाकार समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकादम यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात एका मुलाचे स्वप्न साकार करण्याची धडपड दाखवली आहे. प्लाटून वन फिल्म्स आणि एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट या बॅनरखाली शिलादित्य बोरा निर्मित, ‘पिकासो’चे दिग्दर्शन आणि कथा अभिजीत मोहन वारंग यांनी लिहिली आहे. 

टॅग्स :प्रसाद ओक