दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकणारा आणि प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावणारा परशा अर्थात आकाश ठोसर एका रात्रीत स्टार झाला. ‘सैराट’मध्ये परशा प्रचंड भाव खाऊन गेला. त्याचे डायलॉग, त्याचे आर्चीवरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील परशा अवघ्या महाराष्ट्राचा लाडका बनला. या सिनेमाने परशा अर्थात आकाश ठोसरच्या आयुष्यानेच कलाटणी घेतली. पण सध्या हा परशा कुठे दिसलाच तर तुम्ही ओळखू शकणार नाही. कारण त्याचे नवे लूक़ होय, आर्ची अर्थात रिंकू राजगुरूच्या मेकओव्हरचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील. आता परशा अर्थात आकाश ठोसरचा नवा लूक समोर आला आहे.
नुकतेच आकाशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत. यात त्याचा नवा लूक दिसतोय. ‘सैराट’मधील परशा आणि हा परशा यातला बदल थक्क करणारा आहे. डोक्यावर हॅट, गळ्यात मफलर अशा कूल लुकमध्ये आकाशचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
‘सैराट चित्रपटानंतर आकाश ‘एफयू: फ्रेंडशीप अनलिमिटेड’ चित्रपटात झळकला. या चित्रपटाला ‘सैराट’ इतके यश मिळू शकले नाही. पण चित्रपटातील आकाशचा अभिनय सर्वांनाच आवडला होता. ‘एफयू: फ्रेंडशीप अनलिमिटेड’नंतर नेटफ्लिक्सवरील ‘लस्ट स्टोरिज’ या वेबसीरिजमध्ये त्याने काम केले.
लवकरच तो नागराज मंजुळे यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करताना दिसणार आहे. नागराज यांच्या ‘झुंड’ या सिनेमात तो दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने नागराज मंजुळे-आकाश ठोसर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा येत्या 13 डिसेंबरला रिलीज होणार आहे.