सोशल मीडियावर सध्या धुरंधर सिनेमातील FA9LA या गाण्यावरील रील्स प्रचंड व्हायरल होत आहेत. या गाण्याने सगळ्यांनाच वेड लावलं असून रील्सने धुमाकूळ घातला आहे. सेलिब्रिटींनाही FA9LA गाण्यावर रील व्हिडीओ बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. पण, सगळीकडे FA9LA गाण्याचा ट्रेंड असताना मराठी अभिनेताअजिंक्य देव यांना मात्र 'जमालकुडू'चा फिव्हर चढला आहे.
अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते 'जमालकुडू'च्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. डोक्यावर दारुचा ग्लास घेऊन बॉबी देओलसारखा डान्स अजिंक्य देव करत आहेत. 'जमालकुडू' गाण्याच्या हुकस्टेपही ते करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. "ख्रिसमस सेलिब्रेशन" असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. अजिंक्य देव यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
अजिंक्य देव हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. अभिनय आणि हिट सिनेमे देऊन त्यांनी ८०-९०चं दशक गाजवलं. मराठीसोबतच त्यांनी हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'घरत गणपती' या मराठी सिनेमात ते दिसले होते. तर अलिकडेच त्यांचा '१२० बहादूर' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.