Join us

​रिंकू राजगुरूनंतर तिचे आई-वडील झळकणार या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 15:02 IST

रिंकू राजगुरूला तिच्या सैराट या पहिल्याच चित्रपटामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातील तिने साकारलेल्या आर्ची या भूमिकेचे चांगलेच कौतुक ...

रिंकू राजगुरूला तिच्या सैराट या पहिल्याच चित्रपटामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातील तिने साकारलेल्या आर्ची या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. रिंकू ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक सामान्य मुलगी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मुंजुळे काही कामानिमित्त रिंकूच्या गावात गेले होते. त्यावेळी त्यांनी तिला तिथे पाहिले आणि आर्ची या भूमिकेसाठी रिंकूच योग्य असल्याची त्यांची खात्री पटल्याने त्यांनी या चित्रपटासाठी तिची निवड केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड गल्ला जमवला. आजवर बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपट अशी आज सैराटची ओळख आहे. या चित्रपटासाठी रिंकूला आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. केवळ एवढेच नव्हे तर तिला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. रिंकूने सैराट या चित्रपटानंतर मनसु मल्लिगे या दाक्षिणात्य चित्रपटातही काम केले होते. हा चित्रपट सैराटचाच हिंदी रिमेक होता. रिंकू यानंतर आता मकरंद माने यांच्या मराठी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटावर सध्या ती काम करत आहे. रिंकूनंतर आता तिचे आई-वडील देखील प्रेक्षकांना चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. हो, तुम्ही जे वाचले आहे ते खरे आहे. रिंकू एक सामान्य घरातून आल्याने तिच्या कुटुंबाचा आजवर कधीच चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध आलेला नव्हता. पण आता रिंकूचे आई-वडील प्रेक्षकांना एक मराठा लाख मराठा या चित्रपटात झळकताना दिसणार आहेत. काही महिन्यांपूर्वी मराठी क्रांती मोर्चा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये निघाला होता. यावरच आधारित या चित्रपटाची कथा असून रिंकूची आई आशा राजगुरू आणि वडील महादेव राजगुरू प्रेक्षकांना या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रिंकु ही एक खूप चांगली अभिनेत्री असल्याचे तिने सैराट या तिच्या पहिल्याच चित्रपटाद्वारे सिद्ध केले आहे. आता तिचे आई-वडील कसा अभिनय करतात हे प्रेक्षकांना एक मराठा लाख मराठा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळणार आहे.  Also Read : व्हिडीओमुळे वैतागली आर्ची; म्हटले, ‘ती मी नव्हेच’ !