Join us  

Sher Shivraj Teaser: ‘पावनखिंड’नंतर येतोय ‘शेर शिवराज’, अंगावर काटा आणतो चित्रपटाचा टीझर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 11:08 AM

Sher Shivraj Teaser: आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला, अन्याय निवारण्यासाठी तेव्हा कणाकणांतून बाहेर पडला, सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह... शेर शिवराज.. चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहिर झाली आहे.

Sher Shivraj Teaser: लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या ‘पावनखिंड’ (Pawankhind) या चित्रपटावर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्यात.  बॉक्स ऑफिसवरही या सिनेमानं बक्कळ कमाई केली. ‘पावनखिंड’नंतर चाहत्यांना  प्रतिक्षा आहे ती दिग्पाल यांच्या शिवराज अष्टक फिल्म सीरिजमधील (ShriShivrajAshtak) चौथ्या सिनेमाची. होय, फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या चित्रपटानंतर दिग्पाल शिवरायांवरचा ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा नवा सिनेमा घेऊन येत आहेत. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहिर झाली आहे. दिग्पाल यांनी ‘शेर शिवराज’चा टीझर त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

‘आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला, अन्याय निवारण्यासाठी तेव्हा कणाकणांतून बाहेर पडला, सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह... शेर शिवराज..,’असं हा टीझर शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे. सोबत चित्रपटाची रिलीज डेटही त्यांनी जाहिर केली आहे.

त्यानुसार, येत्या 22 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. टीझरमध्ये शिवरायांची शिवाय अफजल खानाची झलक दिसतेय. सध्या सोशल मीडियावर शेर शिवराजच्या टीझरची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. शिवराज अष्टक फिल्म सीरिज ही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यगाथांची आठ सिनेमांची मालिका आहे. ‘शेर शिवराज’ याच मालिकेतील चौथे पुष्प आहे. या चित्रपटातही अभिनेता चिन्मय मांडलेकर हाच शिवरायांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानच्या वधाचा प्रसंग शिवप्रेमींना अभिमान वाटावा असा आहे. हाच प्रसंग या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. साहजिकच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

गेल्या 18 फेब्रुवारीला दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, अंकित मोहन यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकरनं साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. प्रेक्षकांच्याही या चित्रपटावर उड्या पडल्या.

टॅग्स :दिग्पाल लांजेकरचिन्मय मांडलेकरसिनेमा