Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धग' ते 'भोंगा'नंतर शिवाजी लोटन पाटील यांची नवी कलाकृती 'आतुर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 17:28 IST

Aatur Movie : आपल्या प्रत्येक कलाकृतीला मिडास टच देणारे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या पोतडीतून 'आतुर' प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

चांगल्या कलाकृतीसाठी मराठी प्रेक्षक नेहमीच आतुर राहिले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीनेही वेगवेगळ्या कथानकांच्या माध्यमातून उत्तमोत्तम आणि दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी सादर केल्या आणि सिनेरसिकांची भूक भागवली. मराठी चित्रपट रसिकांच्या अशाच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एक नवा विषय, नवा चित्रपट आणि नव्या धाटणीचं सादरीकरण सज्ज झाले आहे. शिवाजी लोटन पाटील यांच्यासारख्या कसलेल्या दिग्दर्शकाचा हा आगामी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खऱ्या अर्थानं 'आतुर' झाले असतील असं म्हटलं तर ते अजिबात वावगं ठरणार नाही. कारण धग आणि भोंगामुळे त्यांच्या चित्रपटांच्या बाबतीत प्रेक्षकांच्या अपेक्षा कमालीच्या वाढल्या आहेत!

आपल्या प्रत्येक कलाकृतीला मिडास टच देणारे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या पोतडीतून 'आतुर' प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक ६ ऑक्टोबर रोजी लाँच झाला. पण शिवाजी लोटन पाटील यांचा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांची उत्सुकता आत्तापासूनच कमालीची ताणली गेली आहे. या उत्सुकतेत भर घातली ती चित्रपटाच्या मुख्य भूमिकेतील अभिनेत्रीच्या नावानं. अभिनेत्री प्रीती मल्लापुरकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

३ नोव्हेंबरल 'आतुर' चित्रपट येणार भेटीला

खरंतर शिवाजी लोटन पाटील या नावाची वेगळी ओळख मराठी चित्रपट रसिकांना करून देण्याची अजिबात आवश्यकता नाही. २०१४ साली आलेला 'धग' आणि नुकताच आलेला 'भोंगा' या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यापाठोपाठ आता ते 'आतुर' चित्रपट घेऊन येत असल्याचं जाहीर होताच प्रेक्षक दमदार कथानक आणि दर्जेदार सादरीकरणासाठी सज्ज झाले आहेत! ६ ऑक्टोबरला चित्रपटाचा फर्स्ट लुक लाँच झाला असून ३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

'आतुर' या चित्रपटाच्या नावावरून त्याच्या कथानकाविषयी अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. मात्र, शिवाजी लोटन पाटील यांची शैली, विषय हाताळण्याची पद्धत आणि प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत गुंतवून ठेवणारं ताकदीचं सादरीकरण या गोष्टींमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारी कलाकृती ही अपेक्षांची पूरेपूर पूर्तता करणारी असेल याबाबत सगळ्यांनाच खात्री असेल!